Latest

कोल्हापूर : हरिओम नगरातून सात लाखांचा ऐवज लंपास

अमृता चौगुले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : रंकाळा तलावाशेजारील हरिओम नगरातील बंद बंगला फोडून चोरट्यांनी 16 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दुर्मीळ नाणी, रोख रक्कम असा सात लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत पृथ्वीराज चंद्रकांत चव्हाण यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.

चव्हाण यांचे मूळ घर शनिवार पेठेत आहे. हरीओमनगरात त्यांनी बंगला बांधला आहे. याठिकाणी ते आईसोबत राहण्यास आहेत. तसेच कंदलगाव येथे एक कॅफे चालवितात. 24 फेब्रुवारीला ते मित्रांसोबत गोव्याला गेले होते. तर त्यांची आई शनिवार पेठेतील मूळ घरी थांबल्या. मंगळवारी ते कोल्हापुरात परतले. तर बुधवारी हरीओमनगरातील बंगल्यात आले असता मागील दरवाजा उघडा दिसला.

बेडलममधील तिजोरी, कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसल्याने चोरी झाल्याचे त्यांना समजले. बेडरूममधील लॉकरमधील रोख 58 हजार रुपये, 4 तोळ्याचे सोन्याचे तोडे, साडेतीन तोळ्याची चेन, साडेबारा ग्रॅम वजनाची चेन, एक तोळा साडेनऊ ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या, दोन तोळे आठ ग्रॅमची अंगठी, दीड तोळ्याची चेन, आठ ग्रॅमची अंगठी, लॅपटॉप आणि साडे अकरा ग्रॅमची मुघल काळातील मोहर, 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे असा सात लाख 2 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पो. नि. दत्तात्रय नाळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. श्वानासह ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. पण श्वानाला चोरट्याचा माग काढता आला नाही.

चांदीचा ऐवज सोडला

चोरट्यांनी कपाटतील सोन्याचे दागिने व दुर्मीळ नाणी चोरून नेली असली तरी येथील चांदीच्या एकाही दागिन्याला हात लावला नाही. हे दागिने कपाटात होते त्या ठिकाणीच मिळून आले.

SCROLL FOR NEXT