Latest

कोल्हापूर : सेप्टिक टँक, मलजल वाहिन्यांची स्वच्छता रोबोटिक उपकरणांद्वारे

Arun Patil

कोल्हापूर, अनिल देशमुख : मलजल वाहिन्या, सेप्टिक टँक आणि सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता यापुढे यांत्रिकी पद्धतीनेच करावी लागणार आहे. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाने राज्यातील 368 नगरपालिकांना दिले आहेत. त्यानुसार स्वच्छतेसाठी रोबोटिक उपकरणे आणि मैला उपसा वाहनांची तीन महिन्यांत खरेदी करावी लागणार आहे.

हाताने मैला उचलणार्‍या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणारा अधिनियम 2013 पासून केंद्र शासनाने लागू केला आहे. या कायद्यानुसार तसेच स्वच्छ भारत अभियानानुसार सफाई कामगारांना कोणत्याही प्रकारे मैला हाताळण्यास प्रतिबंध केला आहे. यामुळे नागरी भागातील सेप्टिक टँक, मलजल वाहिन्या, सार्वजनिक, सामूहिक शौचालये आदींची स्वच्छता करताना सफाई कामगारांचा मैला हाताळणीशी संबंध येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले असून ही सर्व स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने केली जाणार आहे.

तीन महिन्यांनंतर राज्यातील सर्व नागरी भागात सेप्टिक टँक, मलजल वाहिन्यांची स्वच्छता ही यांत्रिकी पद्धतीने रोबोटिक उपकरणांच्या मदतीनेच केली जाणार आहे. या नव्या आदेशानुसार कर्मचार्‍याला

सेप्टिक टँक अथवा मलजल वाहिन्यात प्रवेश करण्यास प्रतिबंधित केले आहे. यामुळे हाताने मैला हाताळण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद होईल, असा आहे.

यांत्रिकी पद्धतीने स्वच्छतेसाठी मैला उपसा वाहने, रोबोटिक स्वच्छता उपकरणे व इतर यांत्रिकी साधनाचा वापर केला जाणार आहे. या सर्वांचे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे तसेच ही सर्व उपकरणे, वाहनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीसोबत करार करण्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.

स्वच्छता शीघ्रकृती दल

या यांत्रिकी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी केंद्र शासनाने 14420 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. तसेच प्रत्येक नगरपालिकेने स्वच्छता शीघ्रकृती दल स्थापन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT