Latest

कोल्हापूर : सावकारीतून फोफावतेय गुंडाराज!

Arun Patil

कोल्हापूर ; दिलीप भिसे : गड्याला 'ना काम ना धंदा…' दिवसभर खासगी सावकाराची पाठराखण… कर्जाच्या वसुलीपैकी 15 ते 20 टक्के कमाई… दररोजचा मिळकतीचा हाच धंदा … पाच-दहा गुंडांना पोसायचे… हवे-नको ते सारे पुरवायचे… दहशतीसाठी स्वत:च्या नावाची टोळी निर्माण करायची… सावकारीतून गुन्हेगारीत बस्तान बसवायचे…सध्या संघटित टोळ्यांचा या क्रमानेच प्रवास सुरू झाला आहे.

जिल्ह्यातील किमान सात ते आठ संघटित टोळ्यांचे म्होरके गजाआड असतानाही त्यांच्या वसुलीची यंत्रणा अजूनही सुरू आहे. गरीब व गरजू तरुणांना हेरून, आमिष दाखवून त्यांना गुन्हेगारीच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा उद्योग सुरू झाला आहे. या साखळीत शेकडो तरुणांची फरफट झाली आहे.

शासकीय यंत्रणांना फिकीर नाही!

कोल्हापूर शहरासह उपनगरात अनेक सावकारी टोळ्यांनी दहशत निर्माण केली आहे. गरजूंच्या स्थावर मालमत्तांवर डोळा ठेवून दरमहा 35 ते 40 टक्के व्याजाने कर्जाचा पुरवठा करून कालांतराने संबंधितांना लुटण्याचाच उद्योग सुरू आहे. त्यात ग्रामीण भागातील सावकारही आहेत. लोकांना जुलमी सावकारशाहीची झळ सोसावी लागत आहे.

सावकारी तोरा

लखलखणार्‍या अंगठ्या, ऐषआरामी जीवनमान अन् सोबतीला वसुलीसाठी गुडांची फौज… धाकलं मालक, थोरलं मालक, गरिबांचा तारणहार, मसिहा, दादा, भाऊ, नाना… नावासमोर एक ना अनेक बिरुदावली लावली आहे… सावकारी पाशातून गोरगरिबांना पिळायचं, मालमत्तांवर कब्जा करायचा… अन् उलट स्वत:च शिरजोर होऊन खोट्या प्रतिष्ठेची शाल पांघरून घ्यायची!

राजकीय वर्तुळात घुसखोरी

सावकारीतून विनासायास आलेला बक्कळ पैसा आणि मिळणार्‍या राजकीय वरदहस्तामुळे पोलिस दप्तरी गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या अनेक बड्या सावकारांनी राजकीय वर्तुळातही घुसखोरी करून मानाच्या पदावर कब्जा केला आहे. स्वत:सह पत्नी, मुलगा, सून यांना पुढे करून स्थानिक स्वराज्य संस्थांसह सरकारी कमिट्यांवरही बस्तान बसविले आहे.

गोरगरिबांची राखरांगोळी, लोकप्रतिनिधी मात्र चिडीचूप!

सावकारी पाशातून गोरगरिबांची राखरांगोळी होत असतानाही राजकीय मंडळी चिडीचूप आहेत. सावकारी चक्रात फसलेली गोरगरीब कुटुंबे न्यायासाठी राजकीय नेत्यांसह प्रशासकीय कार्यालयाचे उंबरेही झिजवतात. 'ना दाद ना फिर्याद'अशीच त्यांची अवस्था झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT