Latest

कोल्हापूर-सांगली चे चौपदरीकरण

अमृता चौगुले

कोल्हापूर; सुनील सकटे : कोल्हापूर-सांगली रस्त्याची दुरवस्था रोखण्यासाठी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचआय) केले जाणार आहे. चौपदरीकरणासाठी डीपीआर बनविण्यास केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. प्राधिकरणाच्या स्थानिक कार्यालयातर्फे पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करायला भाग पाडणार्‍या कोल्हापूर-सांगली रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. ठेकेदाराने केवळ 65 ते 70 टक्के काम करून टोल लावण्याची भूमिका घेतल्याने वाद सुरू झाला. हा वाद लवादाकडे गेल्याने प्रक्रिया रखडली. या रस्त्यावर राज्य शासनाने 20 कोटी रुपये खर्च केला. मात्र, या निधीतून कोणती कामे झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. नुकतेच या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा रस्ता वर्ग केल्यानंतर केेंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा दीड कोटी रुपयांचा डीपीआर बनविण्यास मान्यता दिली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयातर्फे डीपीआर बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. डीपीआर तयार झाल्यानंतर या मार्गाचे तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या रस्त्यावरील अनेक ठिकाणी सेवामार्ग गायब आहेत. हातकणंगले, अतिग्रे, निमशिरगाव, तमदलगे आदी ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ही सर्व ठिकाणे अपघात प्रवणक्षेत्र बनल्याने अपघात होतात. हातकणंगले आयटीआय, मजले, लक्ष्मीवाडीत रस्ता खचल्याने अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्ता दुभाजकांची दुरवस्था असून रस्ता दुभाजकच अपघातास निमंत्रण देत आहेत.

ठिगळं जोडल्याप्रमाणे रस्त्याचे काम

वाढते अपघात पाहून राज्य सरकारने 20 कोटींचा निधी मंजूर केला. 20 कोटी रुपयांत रस्ता दुरुस्ती शक्य नसल्याने अक्षरश: ठिगळं जोडल्याप्रमाणे काम झाले आहे. या रस्त्याचे आता एनएचआयतर्फे चौपदरीकरण होणार असल्याने रस्त्याची दुरवस्था दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. एनएचआयतर्फे सध्या मिरज-सोलापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आता डीपीआर बनविण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूर- सांगली महामार्ग दुरुस्तीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT