Latest

कोल्हापूर : संघटित गुंड, तस्करी टोळ्यांसह व्हाईट कॉलर गुन्हेगारीचे आव्हान!

Arun Patil

कोल्हापूर, दिलीप भिसे : महेंद्र कमलाकर पंडित… कोल्हापूर जिल्ह्याचे 35 वे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारत आहेत. गडचिरोली, नांदेड, नंदूरबारसह मुंबई अशा संवेदनशील ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर त्यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शांतता – सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न होत असतानाच अस्थिरता, दहशत माजविणार्‍या समाजकंटकांवर कायद्याचा धाक ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी लागणार आहे. संघटित गुंड, झोपडपट्टीदादा, काळेधंदेवाले, तस्करी टोळ्यांसह 'व्हाईट कॉलर' गुन्हेगारीचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे.

कोल्हापूरने 'मुंबई' बंद पाडला; कल्याणच्या नावे जिल्ह्यात जाळे

महामार्गावर रोज 'कोट्यवधीं'ची तस्करी सुरू आहे. अमली पदार्थांची वाहतूक केली जाते. आरोग्याला घातक ठरणार्‍या रोज सरासरी 80 ते 100 कोटींच्या गुटख्याची उलाढाल होत आहे. सहा वर्षांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी कोट्यवधींच्या उलाढालीचा मुंबई मटका बंद पाडला. अलीकडच्या काळात शहरासह जिल्ह्यात 'कल्याण'सह विविध नावांचा वापर करून मटक्याचे जाळे फोफावत चालले आहे. तीन पानी जुगारी अड्ड्यांचे पेव फुटले आहे. लुटमारी, घरफोडी, चोरीच्या घटनांमुळे सामान्य नागरिकही चिंतेत आहे.

फसवणुकीचे अड्डे रात्रंदिवस सुरू!

आर्थिक फसवणुकीचे अड्डे रात्रंदिवस सुरू आहेत. गुंतवणूक केल्यास कमीत कमी काळात जादा परताव्यांचे आमिष… ए. एस. ट्रेडर्स, 'निवारा'सारख्या अनेक कंपन्यांनी तीन-चार वर्षांत कोल्हापूरकरांना अक्षरश: लुटले आहे. ए. एस. ट्रेडर्स कंपनीच्या फसवणुकीची व्याप्ती आता साडेपाच हजार कोटींवर जाऊ लागली आहे.

व्हाईट कॉलर गुन्हेगारी, गुंडांच्या टोळ्या

शहर, जिल्ह्यात व्हाईट कॉलर गुन्हेगारीचे प्रस्थ वाढू लागले आहे. त्यातून खासगी, सावकारी अड्डे उदयाला आले आहेत. 'गॉडफादर'च्या आश्रयाने गोरगरिबांची पिळवणूक केली जात आहे. ओपन बारचा सिलसिला आहे. बनावट दारूची रेलचेल आहे. उच्चभ—ू वसाहतींमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत.

80 जणांवर 'मोका', 138 तडीपार!

गेल्या चार वर्षांत 12 टोळ्यांतील 80 गुन्हेगारांवर 'मोका'अंतर्गत कारवाई केली. 7 टोळ्यांना स्थानबद्ध केले आहे. दोन वर्षांत तब्बल 138 गुंड तडीपार केले आहेत. यामुळे पंडित यांच्याकडूनही कारवाईची कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे.

SCROLL FOR NEXT