Latest

कोल्हापूर : शहरालगत लवकरच नवीन पोलिस ठाणे

Arun Patil

कोल्हापूर ; गौरव डोंगरे : संवेदनशील समजण्यात येणार्‍या उपनगरांचा समावेश असणारे एक नवे पोलिस स्टेशन लवकरच अस्तित्वात येणार आहे. गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, वाढती लोकवस्ती यानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या पोलिस ठाण्याचा उपयोग होणार आहे. पाचगाव, मोरेवाडी, आर. के. नगर, जरगनगर, संभाजीनगरचा समावेश असणार आहे.

शाहूपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी ही चार पोलिस ठाणी व त्यांच्या चौक्या शहरात व आसपासच्या उपनगरात आहेत. करवीर पोलिस ठाण्यांतर्गत तब्बल शंभरहून अधिक गावांचा समावेश दिसून येतो. याठिकाणी एखादी घटना घडल्यास तत्काळ पोलिस फौजफाटा पोहोचविणे, परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे यासाठी कसरत होते. यासाठी नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव विचारात आला आहे.

गुन्हेगारांवर वचक

पाचगाव, कळंबा या परिसरात येथील नागरिकांच्या सहभागातून काही महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही बसविण्याचा प्रकल्प राबविण्यात आला. यानंतर या भागातील चेनस्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांवर काही प्रमाणात अंकुश आला. आता नव्याने पोलिस ठाणे बनल्यास नवीन अधिकारी, कर्मचारी नियुक्तीमुळे येथील गुन्हेगारीचा बीमोड करण्यास मदत होणार आहे.

संवेदनशील उपनगरे

शहरालगतची पाचगाव, मोरेवाडी, आर. के. नगर, जरगनगर, रामानंदनगर, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत याठिकाणी हाणामारीसह चेन स्नॅचिंगच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडतात. भरदिवसा चेनस्नॅचिंगचे तर रात्री घरफोडीचे प्रकार घडतात. हिवाळी व उन्हाळी सुट्टीत तर येथील बंद बंगले चोरट्यांकडून लक्ष्य करण्यात येतात. अशा गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता या नव्या पोलिस ठाण्याची नितांत आवश्यकता भासणार आहे.

SCROLL FOR NEXT