Latest

कोल्हापूर : शहर सुरक्षेचा तिसरा डोळा ‘डॅमेज’

Arun Patil

कोल्हापूर ; गौरव डोंगरे : चोरी, हाणामारी, वाहतूक नियंत्रण यासह शहराच्या सुरक्षिततेचा मुख्य घटक असणारा तिसरा डोळा डॅमेज झाला आहे. सेफ सिटी उपक्रमांतर्गत बसविण्यात आलेल्या 165 कॅमेर्‍यांपैकी 50 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीअभावी अनेक महिन्यांपासून बंद आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोल्हापूर पोलिस आणि महानगर पालिकेच्या माध्यमातून मुख्य चौक, रहदारीचे रस्ते, कार्यालयांचे चौक अशा 65 ठिकाणी 165 कॅमेरे बसविण्यात आले. यामध्ये 116 स्थिर कॅमेरे, 32 पॅनॉरमिक कॅमेरे व 17 फिरत्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यासाठी साडेसहा कोटींचा खर्च करण्यात आला होता. सुरुवातीला कॅमेर्‍यांची देखभाल- दुरुस्ती महानगरपालिकेकडे होती. 2021 पासून हे सर्व पोलिसांकडे हस्तांतरित झाले आहेत.

तपासकामी मदत

खून, मारामारी, चोरी, घरफोडी यासह ज्या ज्या गुन्ह्यात वाहनांचा वापर होतो अशा वाहनांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मदत होते. तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कारवायांसाठी सेफ सिटीचे कॅमेरे आधार बनलेले आहेत. कोणतीही घटना सीसीटीव्हीद्वारे पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात पाहताही येते. या बहुउपयोगी उपक्रमाला नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे खासगी कॅमेर्‍यांचीच मदत पोलिसांना घ्यावी लागत आहे.

कोट्यवधींचा दंड वसूल

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनधारकांना सीसीटीव्ही फुटेजमधील फोटोच्या आधारे दंडाची नोटीस पाठवली जाते. दरवर्षी यातून कोट्यवधींचा महसूल जमा होतो. मात्र, सीसीटीव्हींच्या दुरुस्तीसाठी विलंब का, हे न उलगडणारे कोडे आहे.

12 कोटींचा प्रस्ताव गृह विभागाकडे

2018-2019 दरम्यान महापालिकेने बारा कोटी रुपये खर्चाचा सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा नवा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. याअंतर्गत शहरातील 25 ठिकाणी एकूण 27 स्थिर कॅमेरे, 6 पॅनॉरमिक कॅमेरे व 17 फिरते कॅमेरे बसविण्याचा विचार आहे. तो प्रस्ताव धूळ खात पडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT