Latest

कोल्हापूर : रस्ते नव्हे, मृत्यूचे सापळे

Arun Patil

कोल्हापूर ; दिलीप भिसे : कोल्हापूर-सागली, कोल्हापूर-रत्नागिरीसह पुणे-बंगळूर महामार्ग अपघातांमुळे धोकादायक ठरू लागले आहेत. कागल, लक्ष्मी टेकडी, गोकुळ शिरगावपासून सांगली फाट्यापर्यंतचा प्रवास जीव मुठीत धरूनच करावा लागतो आहे. सद्य:स्थितीत सांगली फाटा ब्लॅकस्पॉट ठरला आहे. वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे अलीकडच्या काळात किमान सहा-सात प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे.

महामार्गांसह शहरांअंतर्गत रस्तेही खड्ड्यांनी व्यापले आहेत. भाजीपाला विक्रेत्यांसह व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे रस्ते वाहतूक धोकादायक ठरत आहे. कोल्हापूर-सांगली रोडवरील हातकणंगले बसस्थानक – पेट्रोल पंपासमोरील रोड अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे या रस्त्याचे हस्तांतर झाले असले तरी प्राधिकरणाने मात्र झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येते.

अभियंत्यांच्या स्वप्नांचा चुराडा!

कोल्हापूर – सांगली रोडवर माले फाटा येथे 7 मार्चला झालेल्या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा बळी गेला. शीतल पाटील (हरोली) आणि सूरज शिंदे (चंदूर) अशी त्यांची नावे आहेत. सूरजचा दोन आठवड्यांपूर्वी साखरपुडा झाला होता.

दोघेही जिवलग मित्र, जिद्दीने शिक्षण घेत अभियंता पदापर्यंत मजल मारली होती. तरुण मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांवरही दु:खाचा डोंगर कोसळला होता. एका क्षणात त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला.

सीपीआरमध्ये दररोज 50 पेक्षा जास्त अपघातांची नोंद

सीपीआर पोलिस चौकीमध्ये रोज सरासरी 60 ते 70 छोट्या-मोठ्या नोंदी होत असतात. मोटार अपघात, विष प्राशन, गर्दी मारामारी आणि सर्पदंश अशा घटनांचा समावेश असतो. यात मोटार अपघात घटनांचा सर्वाधिक समावेश आहे. सायंकाळनंतर अपघाताच्या घटनांनी सीपीआर हाऊसफुल्‍ल झालेले असते. रोज सरासरी 40 ते 50 अपघाती घटनांचा समावेश असतो.

जिल्ह्यातील वाहतूक धोकादायक बनू लागली आहे. चालकाची बेफिकिरी असो अथवा रस्त्यावरील खड्डे , जिल्ह्यात जीवघेण्या अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. एक मार्च ते 13 मार्च या 13 दिवसांत लहान-मोठ्या अपघातांमध्ये 28 जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. जिल्ह्यात वर्षाला सरासरी तीनशे ते साडेतीनशेवर तर तीन वर्षांत 1 हजार 66 जण अपघाताचे बळी ठरले आहेत.

कोल्हापूरसह परिसरातील घटना

2 मार्च : मडिलगे, हणबरवाडी (भुदरगड) अपघातात सुनील पाटील व नामदेव गुरव यांचा मृत्यू

4 मार्च : कोल्हापूरचे डॉक्टर अरुण मोराळे विठ्ठलवाडीजवळील अपघातात ठार

6 मार्च : निगवे दुमालाजवळ ट्रक पलटी होऊन धनगरवाडीतील मेंढपाळ ठार

7 मार्च : माले फाट्याजवळ भीषण अपघातात दोन तरुण अभियंते जागीच ठार

8 मार्च : दोनवडेतील अपघातात तांदूळवाडी येथील राजवर्धन पाटील ठार

10 मार्च : आंबा घाटात मोटार कोसळून सांगलीतील माय-लेकरांचा मृत्यू; तर सात जण जखमी

12 मार्च : व्हन्‍नूर (कागल) फाट्यावर केनवडेतील चुलत्यासह पुतण्या जागीच ठार

13 मार्च : जोतिबा दर्शनावरून परतताना ट्रॅक्टर दरीत पडून 1 ठार, 22 जखमी

13 मार्च : महामार्गावर संकेश्‍वरजवळ डॉक्टर महिलेसह मुलगी ठार, पती गंभीर

13 मार्च : पंढरपूरजवळ वारकर्‍यांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक : पाच ठार; तर 35 जण जखमी

SCROLL FOR NEXT