Latest

कोल्हापूर महापालिकेच्या 50 वर्षांत नागरी प्रश्न ‘जैसे थे’…!

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  नगराचं महानगर झालं म्हणजे काय झालं तर कोल्हापूर नगरपालिका या फलकाची जागा कोल्हापूर महापालिका या नवीन फलकाने घेतली. या घटनेला दि.15 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. नगरपालिकेची महानगर पालिका होत असताना शहराची हद्द एका इंचानेही वाढली नाही. महानगर करून नेमकं साधलं तरी काय, असा प्रश्न 50 वर्षांनंतर पडावा, अशी परिस्थिती आहे. 50 वर्षांत शहराचे प्रश्न आहे तसेच कायम आहेत.

उलट दिवसेंदिवस शहर बकाल होत आहे. याला आजवरचे सर्व सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत. शहराच्या प्रश्नासाठी ना राजकीय ताकद कुणी पणाला लावली, ना प्रशासनाने शहराचे प्रश्न सोडवण्यात ठाम अशी भूमिका घेतली. 50 वर्षांनंतरही रस्त्यातील खड्डे, पंचगंगेचे प्रदूषण, उद्यानांचे उकिरडे, क्रीडांगणांचे ओपन बार, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, आजार विकणारा बाजार, विद्यार्थ्यांची वाट पाहणार्‍या शाळा हेच चित्र कायम आहे. हे बदलण्याची हिंमत कोण दाखवणार, यावरच या शहराची वाटचाल अवलंबून आहे. याच प्रश्नांचा घेतलेला धावता आढावा.

पंचगंगेचे प्रदूषणही सुरू

कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगेभोवती प्रदूषणाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत आहे. नदी प्रदूषणप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेसह अन्य प्रदूषणकारी घटकांवर 1997 पासून कारवायांचा आसूड उगारला जात आहे. पंचगंगेच्या संरक्षणासाठी जनआंदोलने केली जात आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये पंचगंगेच्या प्रदूषणप्रश्नी कोल्हापूर महानगरपालिकेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 24 वेळा नोटिसा धाडण्यात आल्या. दोनवेळा महापालिकेच्या मुख्य इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
तरीही शहरातील संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया होत आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना कावीळ, गॅस्ट्रोसारख्या जीवघेण्या आजारांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे.

पंचगंगेची ही सद्यस्थिती प्रदूषण सुरू, आंदोलने सुरू आणि कारवाईही सुरूच अशी झाली आहे. कारवाया खूप झाल्या, आता नदी प्रदूषणमुक्त करण्याची गरज आहे ती कृतीची. देशातील सर्वाधिक दहा प्रदूषित नद्यांपैकी एक असा बदलौकिक पंचगंगेच्या माथी मारण्यात आला आहे. मात्र, तो पुसण्यासाठी कागदी नोटिसांपलीकडे एकही पाऊल पडले नाही. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी, मुळा-मुठा या नद्यांच्या  प्रदूषण मुक्तीसाठी ठोस अशी पावले पडत असताना पंचगंगेचे वावडे का असा प्रश्न आहे.

पर्यटक राम भरोसे

कोल्हापूर शहरात अंबाबाईच्या दर्शनासाठी दरवर्षी 30 लाखांहून अधिक भाविक येतात. त्यांच्यामुळे या शहरातील व्यापाराला चालना मिळत आहे. कोल्हापूरी गुळ, चप्पल, चटणी, मसाल्यापासून ते अनेक वस्तूंची खरेदी हे पर्यटक करतात. त्याच्या वास्तव्याने हॉटेल व्यवसायाला चालना मिळते. मात्र पर्यटकांची कोणतीही सोय महापालिका पहात नाही. ना स्वच्छता गृहे ना धड रस्ते अशीच अवस्था आहे.

उद्यांनांना अवकळा

कोल्हापूरचा बंगळूरनंतर उद्यानांचे शहर असा लौकिक होता. कोल्हापूर शहरात 54 उद्याने आहेत. शहाराची सहा लाख लोकसंख्या आणि 54 उद्याने हे प्रमाण खुपच चांगले आहे. मात्र उद्यानांची निगा राखण्यात महापालिका सप्शेल अपयशी ठरली आहे. शहरातील उद्यांनाना अवकळा आली आहे.

मैदानाचे ओपन बार बंद कोण करणार

क्रीडानगरी असा नावलौकीक असणार्‍या कोल्हापूरच्या महापालिकेकडे एकेकाळी स्वतंत्र क्रीडा विभाग अस्तित्वात होता. मात्र कांही काळानंतर तो बंद पडला. महापालिकेकडे शहराच्या विविध भागात 4 मैदाने आहेत. मात्र त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे खेळाडूंना सरावासाठी मैदाने शोधत फिरावे लागत आहे. मनपाचे जलतरण तलाव 3 असून यापैकी एखादाच वर्षभर सुरु असतो. व्यायाम शाळांच्या संख्या 12 असून या पैकी मोजक्याच सुस्थितीत आहेत. 4 योग केंद्रे, एक शुटींग रेंज, एक कुस्ती मैदान, 9 बॅडमिंटन हॉल मनपाकडे आहेत.मात्र त्यांच्या देखभाल-दुरुस्ती व व्यवस्थापनासाठी निधी नाही.

ड्रेनेज योजना अपुरी, शहरात सांडपाण्याचे साम—ाज्य

कोल्हापूर शहरात 1967 सालची लोकसंख्या गृहीत धरुन ड्रेनेज योजना राबण्यात आली. ही योजना राबवल्यामुळे शहरातील गटारे केवळ पावसाळ्यातच पाणी वाहून नेण्यासाठी उपयोगात आली पाहिजेत मात्र अपुरी ड्रेनेज योजना, ड्रेनेजला न जोडलेले घरचे सांडपाणी यामुळे गटारे नेहमी तुडुंब भरुन रस्त्यावरुन वाहतात आणि पंचगंगेचेही प्रदूषण करतात. शहरातील ड्रेनेज लाईनचे जाळे300 किलोमीटरचे आहे तर 400किलोमीटर ड्रेनेज लाईनची गरज आहे.

भाजी बाजारांची वाईट अवस्था

शहरातील भाजी बाजार म्हणजे अक्षरश आजार विकणारी केंद्रे बनण्याच्या मार्गावर आहेत.स्वच्छता नसल्याने संपुर्ण बाजारांचे आरोग्य बिघडले आहे. शहरातील काही बाजारांना उकिरड्याचे स्वरुप आले आहे. हे चित्र बदलणार कधी. कपिलतीर्थ मार्केटमध्ये तर ठेवलेला पाय आत कधी जाईल अशी अवस्था आहे. घुशी आणि उंदरांनी बराचसा भाग भुसभुशीत केला आहे. थोड्या फार फरकाने हेच चित्र अन्या भाजी बाजारांमध्ये आहे. हे बदलण्यासाठी केवळी प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

कचर्‍याची विल्हेवाट लावायची कशी?

शहरातील कचर्‍याच्या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. नगरपालिका असताना कचरा डेपोसाठी निवडलेल्या जागेवर आजही कचरा टाकला केला जातो. परंतू त्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे याठिकाणी कचर्‍याचा डोंगर झाला आहे. आजपर्यंत कोट्यवधी रुपये कचर्‍यावरील प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पांवर खर्च करण्यात आला. परंतू प्रकल्प राबविणारे मलिदा घेऊन गेले कचर्‍याचा डोंगर मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. दहा-बारा वर्षापुर्वी शहरात 110 ते 120 टन कचरा निर्माण होत होता. आता त्याच्या दुप्पट म्हणजे 200 ते 210 टन कचरा निर्माण होत आहे. या कचर्‍याचे केवळ वर्गीकरण केले जात आहे. परंतू हे करण्याची यंत्रणा पाहता निर्माण होणार्‍या कचर्‍याच्या दहा टक्के देखील काम होताना दिसत नाही.

कचर्‍याची निर्गत करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे आवश्यक आहे. परंतू ती होताना अजूनही दिसत नाही. मध्यंतरी कचर्‍यापासून खत करण्याचा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाला. परंतू तो यशस्वी झाला नाही. कचर्‍यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू या प्रकल्पातील ऊर्जा निर्माण होण्यापुर्वी गायब झाली. परिणामी कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

महापालिका शाळा झाल्या कमी, केएमसीची जबाबदारी सीएचबींवर

महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडून सुरु असलेल्या 58 शाळा व एकमेव यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेजमधून गरजू, गरीब विद्यार्थ्यी शिकत आहेत. मात्र, महापालिकेच्या शाळा कमी झाल्या आहेत. केएमसी कॉलेजची शैक्षणिक कार्याची जबाबदारी तासिका तत्वावरील प्राध्यापक पार पाडत आहेत.

महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने पूर्वी सुमारे 75 प्राथमिक शाळा चालविल्या जात होत्या. सध्या 58 प्राथमिक शाळा असून पटसंख्या 10 हजार 200 आहे. यातील काही शाळांनी शासकीय शिष्यवृत्तीसह विविध उपक्रम राबवून गुणवतेच्या जोरावर पटसंख्या टिकवून ठेवली आहे. राज्यात शहरी भागातील शिष्यवृत्तीत कोल्हापूर शहरातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिध्द केली आहे. डॉ. ग.गो.जाधव विद्यालय, लक्ष्मीबाई जगर, टेंबालईवाडी विद्यालय, नेहरू विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, कॉ. गोविंदराव पानसरे विद्यालय शैक्षणिक गुणवत्तेत पुढे असल्याचे दिसून येते

रंकाळा सोसतोय मरणकळा

कोल्हापूरच्या सौंदर्याचे मुख्य आकर्षण असणारा ऐतिहासिक रंकाळा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. अनेकवेळा थेट तलावात मिसळणारे सांडपाणी मोठ्या प्रमाणात जनावरे आणि कपडे तलावात धुतले जात असल्याने पाण्याची गुणवत्ता दिवसागणिक ढासळत आहे. रंकाळ्याच्या संवर्धनासाठी वर्षोनवर्षे आंदोलने सुरु आहेत. मात्र याची फारशी दखल घेतली जात नसल्याने रंकाळा मरणकळा सोसत आहे.

हिरवेगार पाणी, शेवाळ, दुर्गंधी आणि पाण्यात तरंगणार्‍या प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा यामुळे वैभवशाली सौंदर्य असणार्‍या रंकाळा तलावाचे अक्षरश विद्रूपीकरण झाले आहे. रंकाळ्याचे सौंदर्य खुलण्यासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अशाच प्रकारे तलावच्या पाण्याची गुणवत्ता आणि जैवविवधतेचा ठेवा जपण्यासाठी ठोस पावले उचलने गरजेचे आहे. शहरातील ऐतिहासिक तलाव म्हणून ओळखल्या जाणारा कोटीतीर्थ तलावही जलपर्णीच्या विळख्यात अडकला होता. सध्या या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. पण तलावात मिसळणारे प्रदूषीत पाण्याचे प्रवाह रोखण्यात महापालिका सपशेल फेल गेली आहे.

झोपडपट्ट्यांत प्राथमिक सुविधांची वाणवा

झोपडपट्ट्यांचा विकासास महापालिका प्रशासन प्राधान्य देत आहे. शहरात एकुण 64 झोपडपट्ट्या आहेत. महापालिकेने या झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आजही अनेक भागात गटर्स रस्ते या प्राथमिक सुविधांची वाणवा दिसून येते. शासनाच्या विविध घरकुलयोजनांतून झोपड्यांच्या ठिकाणी पक्की घरे बांधण्यात येत आहेत. काही ठिकाणी नागरीकांना पक्की घरे मिळाली आहेत. मात्र सर्वच ठिकाणी योजना पोहचल्या नाहीत. त्यामुळे सर्वासाठी घरे या केंद्र सरकारच्या योजनेतून झोपडपट्ट्याचे पुनर्रवसन केल्यास झोपडपट्टीत पक्की घरे होण्यास वेळ लागणार नाही.

वर्षानुवर्षे खड्ड्यांचे साम—ाज्य

कोल्हापूर शहरात 1 हजार 23 किलोमीटरचे रस्ते आहेत. मात्र, जवळ जवळ 60 के 65 टक्के रस्ते खड्ड्यांमध्ये आहेत. एकही रस्ता धड नाही. अगदी महापालिकेजवळील रस्त्याची देखील चाळण झाली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या रस्त्यांपेक्षा आसपासच्या ग्रामीण भागात ग्राम पंचायतींनी केलेले रस्ते एकदा महापालिकेने पाहिले पाहिजेत. म्हणजे रस्ता कसा असावा, याचे दर्शन त्यांना घडेल. 42 वर्षार्ंपूर्वी शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. त्यावेळी रिक्षाचालकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मोर्चा काढून आवाज उठविला होता. पुन्हा अशा अनेक आंदोलनांचा इशारा देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT