Latest

कोल्हापूर : फुटबॉल सामन्यावेळी हाणामारी; लाठीमार

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : प्रॅक्टिस फुटबॉल क्लबविरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामन्यावेळी प्रेक्षक गॅलरीत हुल्लडबाजांत; तर मैदानात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. यामुळे मैदानात पाण्याच्या बाटल्या, चपला; तर मैदानाबाहेर एकमेकांवर दगडफेकीचा प्रकार घडला. यामुळे पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. प्रजासत्ताक दिनामुळे आठ दिवस सामने बंद होते. शनिवारी सामन्यांना पूर्ववत सुरुवात झाली. तिसर्‍या फेरीतील पहिला सामना दुपारी 2 वाजता, फुलेवाडी मंडळविरुद्ध उत्तरेश्वर तालीम यांच्यात झाला. यानंतर 4 वाजता, शिवाजी मंडळविरुद्ध प्रॅक्टिस क्लब यांच्यात महत्त्वाचा सामना असल्याने मैदानात फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. उन्हाचे चटके सहन करत मोठ्या संख्येने फुटबॉलप्रेमी दुपारी 2 वाजल्यापासूनच दाखल झाले होते.

प्रेक्षक गॅलरीत समर्थक भिडले

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांतील समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी सुरू ठेवली. पूर्वार्धात 35 व्या मिनिटाला प्रॅक्टिस क्लबने गोल नोंदवत आघाडी मिळविली. यामुळे प्रॅक्टिस क्लबच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. शिवाजी मंडळकडून गोल फेडण्यासाठी जोरदार चढाया सुरू झाल्या. मात्र, प्रॅक्टिस क्लबकडून या चढाया फोल ठरवण्यात आल्या. यामुळे मैदानात खेळाडूंत; तर प्रेक्षक गॅलरीत समर्थकांतील ईर्ष्या शिगेला पोहोचली. एकमेकांविरोधी अश्लील घोषणाबाजी, हिणकस शेरेबाजी आणि शिव्या देण्याचा प्रकार सुरू झाला. हुल्लडबाजांनी एकमेकांच्या अंगावर जात हाणामारी सुरू केली. यामुळे प्रेक्षक गॅलरीत प्रचंड गोंधळ व ढकलाढकली झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दोन्ही संघांतील खेळाडूंना 'रेड कार्ड'

उत्तरार्धातील सामन्यावेळीही दोन्ही संघांतील खेळाडूंत अटीतटीची झुंज सुरूच होती. प्रॅक्टिस क्लबचा राहुल पाटील व शिवाजी मंडळचा संकेत साळोखे यांनी मैदानात गैरवर्तन व नियमबाह्य खेळ करत एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी सुरू केली. यामुळे अनेक खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. पंच, संघव्यवस्थापक, प्रशिक्षक आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली. दोन्ही खेळाडूंना मुख्य पंच सुनील पोवार यांनी 'रेड कार्ड' दाखवून सामन्याबाहेर केले.

सामन्यानंतर खेळाडूंत हाणामारी

सामना संपल्यावर दोन्ही संघांतील काही खेळाडूंत मारहाणीचा प्रकार झाल्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना भिडले. एकमेकांच्या अंगावर धावत जाऊन अक्षरश: फ्री स्टाईल हाणामारी सुरू केली. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही त्यांना न जुमानता ही हाणामारी सुरूच होती. यामुळे दोन्हीकडचे समर्थही भडकले. तंग वातावरणात मैदानाबाहेर दोन्हीकडचे समर्थक आमने-सामने आले. काही हुल्लडबाजांनी दगड-विटा फेकण्यास सुरुवात केली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता लाठीमार करून हुल्लडबाजांना चोप देत गर्दी पांगविली.

'असला फुटबॉल नको रे बाबा…'

कोल्हापुरात सध्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. यासाठी राज्यभरातील मुला-मुलींचे संघ कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कोल्हापूरच्या फुटबॉल प्रेमाची ख्याती सर्वदूर असल्याने सायंकाळी हे खेळाडू छत्रपती शाहू स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. मात्र, सामन्यावेळी खेळाडू, त्यांचे समर्थक व हुल्लडबाजांनी केलेल्या अशा प्रदर्शनामुळे 'असला फुटबॉल नको रे बाबा…' अशाप्रकारची भावना त्या बिथरलेल्या नवोदित खेळाडूंच्या चेहर्‍यावर दिसत होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT