Latest

कोल्हापूर : फाळकूटदादांची जीवघेणी दहशत!

निलेश पोतदार

कोल्हापूर ; दिलीप भिसे : विनासायास कमाईला सोकावलेल्या आणि दहशतीच्या बळावर कष्टकर्‍यांसह व्यावसायिकांनाही हैराण करून सोडणार्‍या फाळकूटदादांची मिजासखोरी वाढली आहे. अलीकडच्या काळातील गंभीर कारनाम्यांचे अवलोकन केल्यास फाळकूटदादांची दहशत जीवघेणी ठरत आहे. खंडणीसाठी धमकावून ब्लॅकमेल करणे, येथेच्छ ढोसायची अन् टेबलावर बिल आले की व्यावसायिकांवर गुरगुरायचे, शस्त्रांच्या धाकाने दहशत निर्माण करण्याचा फंडाच सुरू आहे.

गुंडागर्दीचा आलेख वाढत असतानाही जुजबी कारवाईवर कागदोपत्री मेळ घालण्याचा स्थानिक यंत्रणांचा खटाटोप सुरू आहे. जानेवारी ते 30 सप्टेंबर 2021 या काळात जिल्ह्यात खंडणी वसुली 14, दहशत, गुंडागर्दीतून हाणामार्‍या व घातक हल्ल्यांच्या पोलिस दफ्तरी 303 पेक्षा घटनांच्या ठळक नोंदी आहेत.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून!

राजकीय दबाब आणि चिरीमिरीवर स्थानिक पातळीवर समझोता झालेल्या घटनांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. अडचणीच्या काळात कोणी तरी धावून येतो. पोलिसांच्या नाकावर टिच्चून सोडवून आणतो, ही भावना गुन्हेगारांत निर्माण झाली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांचा टक्का वाढला आहे.

राज्यकर्त्यांचाही मतांच्या गठ्ठ्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांकडे कानाडोळा आहे. यामुळेच संघटित टोळ्यांसह फाळकूटदादाही शिरजोर बनू लागले आहेत. राजारामपुरीतील 11 व्या गल्लीत घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी आणि संताप वाढविणारी आहे.

दहशतीमुळे निष्पाप बळी!

अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मसाज पार्लरसह अन्य बाबी चौकशीतून स्पष्ट होतील. मात्र, खंडणीला सोकावलेल्या आणि पोलिसांच्या नावावर ब्लॅकमेल करणार्‍या समाजकंटकांच्या कृत्यामुळे एका महिलेला स्वत:चा जीव गमवावा लागला. पोलिसांचा छापा पडल्यास अटक होईल, बदनामी आणि मुलीचे ठरलेले लग्न मोडेल, या भीतीपोटी आडोशाला लपण्याचा प्रयत्न करणार्‍या महिलेचा तोल गेला अन् तिला दोन मुलांसह स्वत:च्या जीवाला मुकावे लागले.

खंडणी वसुलीतून स्टॉलधारकांवर जीवघेण्या हल्ल्याचे प्रकार वाढत असतानाही पोलिस यंत्रणा, राजकीय प्रतिनिधींनाही त्याची फिकीर नाही. सहा महिन्यांत किमान आठ-दहा घटना घडूनही यंत्रणा ढिम्म आहे. खंडणीखोरांना पडद्याआड राहून अभय देण्याचा प्रयत्न होत असल्याची परिसरात चर्चा आहे. हा प्रकार लौकिकाला साजेसा नाही, याचे भान पाठीशी घालणार्‍यांना का नसावे?

दारू तस्करीतून मिळकतीचा धंदा

लॉकडाऊन काळात सर्वच व्यवसाय बंद राहिल्याने गुन्हेगारी टोळ्यांनी दारू तस्करीतून बेफाम कमाई केली. चौकाचौकांत पंटरद्वारे तस्करी सुरू होती. आता अनलॉक झाल्याने याच टोळ्यांनी दहशतीच्या बळावर लूटमारीचा उद्योग चालविला आहे. सराईत टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस यंत्रणेने आता दिखाऊ नको, कारवाईसाठी आक्रमक पवित्रा घेणे गरजेचे आहे.

खंडणीखोरांना अभय!

कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव हा देश-विदेशातील पर्यटकांच्या आकषर्णाचा केंद्रबिंदू… हजारो पर्यटकांची मांदियाळी असते. त्यामुळे शेकडो व्यावसायिकांचा रोजगार चालतो; पण अलीकडच्या काळात परिसरात कमालीची गुन्हेगारी बोकाळली आहे. रंकाळ्यावर फिरावयास येणार्‍यांनाही लूटमारीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. खंडणीखोरांसह सराईत गुंडांचा इथे मुक्त संचार असतो.

हॉटेल, धाबे व्यावसायिकांत टेन्शन!

गुंडांच्या दहशतीमुळे कष्टकर्‍यांसह हॉटेल, धाबे व्यावसायिकही हैराण झाले आहेत. रात्रीला ग्रुपने यायचे… मनसोक्त ढोसायचे… तांबड्या-पांढर्‍यावर ताव मारायचा… टेबलावर बिल आले की मात्र भानावर येऊन व्यावसायिकांच्या अंगावर धावून जाणे, धक्काबुक्की आणि कामगारांना मारहाण या घटना आता नित्याच्या बनल्या आहेत. फुकट्यांच्या दहशतीला कंटाळून 15 ते 17 व्यावसायिकांनी अनलॉकनंतरही हॉटेल्स, धाबे बंद ठेवले आहेत. महामार्गावर जीव मुठीत धरूनच व्यवसायाचा डोलारा सांभाळावा लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT