कासारवाडी ; उत्तम वडिंगेकर : पाडळी (ता. हातकणंगले) येथे ऐतिहासिक मारुती मंदिराच्या गाभार्याचा जीर्णोद्धार करताना समर्थ रामदास स्वामी परंपरेतील मारुतीची मूर्ती सापडली. याची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी किंवा त्यांच्या अनुयायांनी केली असावी, असे स्थानिक ज्येष्ठ नागरिक सांगतात. याबाबतचा उल्लेख दासबोध ग्रंथातही आला आहे.
गावात मारुतीच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम लोकसहभागातून सुरू आहे. गाभार्यातील सध्याची सिमेंटची मारुतीची मूर्ती बाजूला करून खोदाई करताना त्याच्या मागे मारुतीची दगडी कोरीव मूर्ती गुरुवारी स्थानिकांना आढळली.
सतराव्या शतकातील संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन नारायण सूर्याजी ठोसर ऊर्फ रामदास स्वामी महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला, मारुतीला उपास्य मानणार्या समर्थ रामदासांनी बलोपासनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तत्कालीन समाजाला सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात अकरा मारुतींची स्थापना केली. यातील हातकणंगले तालुक्यातील पारगाव, मनपाडळे येथे मारुती मूर्तींची स्थापना केली. मनपाडळे येथील मूर्तीची स्थापना करून जाताना त्यांच्या अनुयायांनी पाडळी येथे मारूतीची स्थापना केली, असावी अशी आख्यायिका आहे.