Latest

कोल्हापूर : पंढरीची वारी; पण मिरजेतूनच सवारी

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पंढरीच्या वारीसाठी रेल्वेने आषाढी स्पेशल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वारीसाठी जिल्ह्यातील भाविकांना मिरज गाठवी लागणार आहे. 'पंढरीची वारी; पण मिरजेतून सवारी' असाच हा प्रकार आहे. कारण, कोल्हापुरातून एकही आषाढी स्पेशल सोडण्यात आलेली नाही.

कोरोनाचा अपवाद वगळता रेल्वेकडून आषाढी वारीसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातात. यापूर्वी कोल्हापूर स्थानकातूनही अशा विशेष गाड्या धावल्या आहेत. यासह कोल्हापूर-सोलापूर मार्गावर दररोज धावणारी गाडी होती. मात्र, कोल्हापूर-सोलापूर रेल्वे तर बंदच आहे. पण, आषाढीसाठी कोल्हापुरातून एकही गाडी धावणार नाही.

मिरजेतून सुटणार्‍या गाड्या गैरसोयीच्या

आषाढी वारीसाठी मिरज-पंढरपूर आणि मिरज-कुर्डुवाडी या गाड्या दि.5 ते दि.14 जुलै अशा धावणार आहेत. यासह मिरज-पंढरपूर ही विशेष रेल्वे दि.4, 5 आणि 9 व 11 जुलै रोजी धावणार आहे, तर मिरज-नागपूर ही स्पेशलही दि.7 व दि.10 जुलै रोजी धावणार आहे. यापैकी मिरज-पंढरपूर पहाटे पाच वाजता सुटणार आहे. यामुळे या गाडीचा उपयोग होणार नाही. उर्वरित तीन गाड्या या अनुक्रमे दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी, 4 वाजता आणि दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहेत. या गाड्या कोल्हापुरातून जाणार्‍या प्रवाशांसाठी उपयोगी ठरतील. त्याकरिता कोल्हापुरातून मिरजेला जाण्यासाठी त्या कालावधीत सोयीच्या गाड्या नाहीत. यामुळे प्रवाशांचा वेळ जाणार आहे.

पंढरपूर मार्गे धावणार्‍या नागपूर, धनबादही उपयुक्‍त नाही

कोल्हापुरातील भाविकांनी कोल्हापूर-नागपूर ही दर सोमवार आणि शुक्रवारी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी सुटणारी आणि कोल्हापूर-धनबाद दिक्षाभूमी एक्स्प्रेस ही दर शुक्रवारी पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी सुटणार्‍या या गाड्याही गैरसोयीच्या ठरणार आहेत. रविवार, दि.10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि या गाड्या कोल्हापुरातून दि. 8 रोजी सुटतील. यामुळे आषाढी दिवशी जाण्यासाठी दोन दिवस आधीच पंढरपुरात जावे लागणार असल्याने या गाड्याही जिल्ह्यातील भाविकांसाठी उपयुक्‍त ठरणार नाहीत, अशीच स्थिती आहे.

SCROLL FOR NEXT