Latest

कोल्हापूर : पंटरच पोलिसांचे ‘कारभारी’! कमाई… इकडूनही अन् तिकडूनही…

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : दिलीप भिसे

लाचखोरीच्या घटनांमध्ये पोलिस सापडत असल्याने पोलिसांची मध्यस्थी करणार्‍या पंटर्सना सुगीचे दिवस आले आहेत. पंटर्स आता पोलिस ठाण्यांचे 'कारभारी' बनू लागले आहेत. 'अर्थ'पूर्ण उलाढालीसह काळ्या धंद्यांतील वसुलीसाठी पंटर्सचा वापर केला जात आहे. बहुतांशी पोलिस ठाण्यांच्या परिसरात झीरो पोलिस, खबरे आणि पंटर्सचा गराडा पडलेला असतो. अलीकडच्या काळात पोलिसांचे हुकमी ठरलेले खबरे, झीरो पोलिस कालौघात यंत्रणापासून चार हात दूर झाल्याने गुन्ह्यांचा छडा लावताना तपास यंत्रणांची दमछाक होत आहे.

कमाई… इकडूनही अन् तिकडूनही…

एखादा गंभीर गुन्हा रेकॉर्डवर येण्याआगोदर प्रभारी अधिकार्‍यापूर्वी पंटर्सना त्याची खबर लागते. दोन्हीही पार्ट्यांना बोलावून पंटर्सच्या मध्यस्थीने तडजोड घडविली जाते. इकडूनही आणि तिकडून कमाईचा धंदा… नित्याचा झाला आहे.

झीरो गेला अन् पंटर अवतरला!

पोलिस असल्याची बतावणी करून दोन महिन्यांत लुबाडणुकीच्या चार घटना घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी झीरो पोलिस म्हणून ओळखल्या जाणार्‍या तरुणाने शिवाजी विद्यापीठ, महामार्गावर चौघांना लुटले होते. रात्री-अपरात्री प्रवाशांना निर्जनस्थळी अडवायचे. 'पुढे दंगल सुरू आहे', 'खून झाला आहे', 'नाकाबंदी सुरू आहे' अंगावरील दागिने, रोकड रूमालात ठेवण्यास सांगून हातोहात किमती मुद्देमाल घेऊन पसार व्हायचे… गुन्हेगारांचा असा मिळकतीचा उद्योग सुरू झाला आहे. राजारामपुरी पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी सराईताला बेड्या ठोकून चौकशी केली असता, तो झीरो पोलिसच आढळून आला. आता फरक एवढाच की, झीरो गेला अन् पंटर आला..!

प्रवेशद्वारातच पंटर्सचा ठिय्या !

रंंकाळा परिसर, फुलेवाडी, राजेंद्रनगर, कनाननगर, जवाहरनगर, सुभाषनगर, सदर बाजार, विचारे माळ, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, तावडे हॉटेल परिसर संवेदनशील म्हणून ओळखला जातो. कौटुंबिक कलह तसेच क्षुल्लक कारणातूनही वादावादी, हाणामारीच्या घटना घडत असतात. अलीकडच्या काळात तर या परिसरात गंभीर घटना घडू लागल्या आहेत. अशा घटनांमध्ये दोन्ही गट पोलिस ठाण्यांकडे धाव घेण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र, अशावेळी तक्रारदारांपूर्वीच पंटर्स पोलिस ठाणी गाठतात आणि सुरू होतो मिटमिटवी अन् तडजोडीचा खेळ..!

खबर्‍यांच्या जागी आता पंटर्स

खबर्‍यांची जागा आता पंटर्सनी घेतली आहे. 'जिकडे माल… तिकडे ताल' असा त्यांचा शब्द प्रचलित झाला आहे. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरीसह जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या शिवाजीनगर, गावभाग, शहापूर, शिरोळ, कुरुंदवाड, गोकुळ शिरगाव, शिरोली एमआयडीसीसह जिल्ह्यातील अन्य काही पोलिस ठाण्यांच्या परिसरात पंटर्सचा गराडा पडलेला असतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT