Latest

कोल्हापूर : ‘पंचमहाभूत लोकोत्सवा’ने पर्यावरण रक्षणाची लोकचळवळ उभी राहील

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने होणार्‍या 'सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा'तून पर्यावरण रक्षणाची लोकचळवळ उभी राहील. हा महोत्सव दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या लोकोत्सवात प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामी उपस्थित होते.

कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या या लोकोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी सुमारे अडीच तास पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा लोकोत्सव जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतावर आधारित आहे. निर्सग आणि पृथ्वीचा ढासळत चाललेला समतोल राखण्यासाठी देशभरातीलच नव्हे तर जगभरातील लोकांत जागृती निर्माण करणारा ठरणार आहे. अतिवृष्टी, भूस्खलन, महापूर, वाढते तापमान, सुनामी अशा अनेक समस्यांचा धोका वाढत आहे. असे धोके, संकटे कमी करण्यासाठी हा लोकोत्सव मार्गदर्शक ठरणार आहे.

विषमुक्त, रोगमुक्त अशी नैसर्गिक, सेंद्रिय शेती करता येते, त्याची उत्पादकता वाढवता येते असे सांगत अशी 'खरी शेती' कणेरी मठावर आज आपण प्रत्यक्ष पाहिली. यामुळे सेंद्रिय शेतीत फायदा नाही, हा समज बदलेल, असे सांगत सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला राज्य शासनाकडून प्रोत्साहन दिले जाईल. त्याची व्याप्ती राज्यभर वाढविली जाईल. याकरिता धोरणात्मक निर्णय घेतले जातीर्लें असेही शिंदे यांनी सांगितले. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी, प्राध्यापकांनाही या लोकोत्सवाचा फायदा होईल.

राज्यात आठवडा बाजार सुरू केले जात असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, जिल्हास्तरावर महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ निर्माण व्हावी याकरिता प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपयांचे अनुदानही दिले जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT