Latest

कोल्हापूर : पंचगंगेतही लवकरच नौकानयनाचा आनंद; जिल्‍हा प्रशासनाकडून तयारी

Arun Patil

कोल्हापूर, अनिल देशमुख : कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरवासीयांसह भाविक, पर्यटकांना लवकरच नौकानयनाचा आनंद मिळणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पंचगंगेत बोटिंग सुरू करण्यात येणार आहे. त्याद़ृष्टीने प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या रंकाळ्यात पर्यटकांना नौकानयनाची सुविधा उपलब्ध आहे.

पंचगंगा घाट परिसराचे शुशोभिकरण केले जाणार आहे. संपूर्ण घाटावरील दगडी पायर्‍या नव्याने बांधल्या जाणार आहेत. त्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांनंतर पंचगंगेचा घाट दररोज सायंकाळी रोषणाईने उजळून निघणार आहे.

शिवाजी पुलाजवळ 'फूड कोर्ट'

जुन्या शिवाजी पुलाचाही पर्यटन वाढीसाठी वापर केला जाणार असून, या ठिकाणी नागरिकांना खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यासाठी बचत गटांच्या माध्यमातून 'फूड कोर्ट' सुरू केले जाणार आहे.

कोल्हापुरात सध्या रंकाळा तलावात नौकानयन आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीपात्रातही आता नौकानयन सुरू करण्याची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पंचगंगा घाट, शिवाजी पूल आणि पंचगंगेच्या पात्रात नावेतून प्रवास, या सर्वांमुळे पंचगंगा घाटही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

पंचगंगेत शिंगणापूर बंधारा ते राजाराम बंधारा, असा नौकानयनासाठी उत्तम मार्ग आहे. या परिसरात पंचगंगेचे पात्र विस्तीर्ण आहे. पाण्याचा प्रवाह मध्यम आहे.

नदीत बारमाही पाणी असतेच. अपवादात्मक परिस्थिती वगळता पाणीपातळी आठ ते दहा फुटांपर्यंत असते. ही सर्व परिस्थिती नौकानयनासाठी अनुकूल आहे, याबरोबरच पंचगंगेवर येणार्‍या भाविकांची तसेच पर्यटकांची संख्याही अधिक असते. यासर्वांचा विचार करून पंचगंगेत नौकानयन सुरू केले जाणार आहे.

SCROLL FOR NEXT