Latest

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असून, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह नवदुर्गा आणि इतर मंदिरांमध्ये सुरू असणारी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी अंबाबाई मंदिराच्या गाभारा गृहातील देवीच्या नित्य पूजेतील चांदीच्या वस्तूंची स्वच्छता करण्यात आली. याशिवाय घाटी दरवाजाजवळील मनकर्णिका कुंडाचीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

महापूर व कोव्हिडच्या तीन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे होत आहेत. यामुळे यंदाचा नवरात्रौत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. याअंतर्गत अंबाबाई मंदिरात विविध उपाययोजना सुरूच आहेत. गुरुवारी मंदिरातील गाभार्‍यातील देवीच्या नित्य पूजेतील चांदीच्या विविध वस्तूंची स्वच्छता गुरुवारी करण्यात आली. यात प्रभावळ, अब्दागिरी, मोर्चेेल, विविध आयुधे, पाट आदींचा समावेश आहे.

याशिवाय परिसरातील विद्युत यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, झाडांच्या फांद्या छाटणे, विविध उपकरणांची स्वच्छता, सीसीटीव्ही यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची उपाययोजना यांसह विविध गोष्टींची पूर्तता करण्यात आली. मंदिर परिसरातील विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दर्शनरांगेसाठीच्या मंडप उभारणीचेही काम सुरू करण्यात आले आहे.

महालक्ष्मी धर्मशाळा व अन्नछत्र सज्ज

दरम्यान, नवरात्रौत्सवासाठी श्री महालक्ष्मी धर्मशाळा व श्री महालक्ष्मी अन्नछत्र या दोन्ही संस्था सज्ज झाल्या आहेत. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही संस्थांची स्वच्छता नुकतीच करण्यात आली असून, दोन्ही संस्थांत कर्मचार्‍यांची संख्याही वाढविण्यात आली. महालक्ष्मी धर्मशाळेमध्ये 700 ते 1000 भाविक राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. धर्मशाळा 24 तास सुरू राहणार आहे. तसेच श्री महालक्ष्मी अन्नछत्रमध्ये दररोज 10 हजार भाविक भोजन प्रसाद घेतील याची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्नछत्राची वेळ थोडी वाढविण्यात आली आहे. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.

पालखी मार्गासह मंदिर परिसरात डांबरी पॅचवर्क करा
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालखीचा मार्ग व अंबाबाई मंदिर परिसरात तातडीने डांबरी पॅचवर्क करावे, भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, असे आदेश महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी दिले. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

डॉ. कादंबरी बलकवडे यांनी, शहरात 12 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. मुरुम व खडीद्वारे पार्किंग सुस्थितीत ठेवा, पोलिसांच्या सूचनेनुसार बॅरिकेडिंगची व्यवस्था करावी, पर्यटकांच्या माहितीसाठी शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना दिल्या.
पार्किंगच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची स्वतंत्र व्यवस्था करावी, महापालिकेची फिरती स्वच्छतागृहे कमी पडत असतील तर इतर नगरपालिकांकडून उपलब्ध करून घ्यावीत, पालखी मार्गाची व मंदिर परिसरात दैनंदिन स्वच्छता करून घेऊन या मार्गाची दररोज फिरती करावी. स्वच्छतेसाठी दैनंदिन कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचे आदेश काढावेत. गुजरी व मंदिर परिसरात सक्शन मशिनद्वारे मेन ड्रेनज लाईन स्वच्छ करावी. याबाबत मुख्य आरोग्य निरीक्षकांना सूचना दिल्या.

निर्माण चौक येथे बाहेरगावाहून येणार्‍या मोठ्या बसेसच्या पार्किंगपासून शाहू मैदान येथे जादा रूटच्या बसेसचे नियोजन करावे, अशी सूचना अतिरिक्त्त परिवहन व्यवस्थापकांना केली. महालक्ष्मी मंदिर परिसरात डॉक्टरांचे वैद्यकीय पथक नेमण्याच्या सूचना आरोग्य अधिकारी यांना दिल्या.

बैठकीस उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्य अधिकारी डॉ. रमेश जाधव आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT