Latest

कोल्हापूर : दिवाळखोरीने यंत्रमागधारक अडचणीत

Arun Patil

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरात कापड व सूत व्यापार्‍यांनी कोट्यवधी रुपयांचे दिवाळे काढून पोबारा केला आहे. दिवाळखोरीमुळे अनेक यंत्रमागधारक आर्थिक अडचणीत आले. वाढत्या दिवाळखोरीच्या पार्श्वभूमीवर दिवाळखोरीवर कडक कायदा करावा, अशी मागणी यंत्रमागधारकांनी केली होती. तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी 'मोका'सारखा कडक कायदा करण्याचे सुतोवाच केले होते. मात्र सरकार बदलल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला आहे. परंतु दिवाळखोरीला चाप बसवण्यासाठी कायदा होणे गरजेचे बनले आहे.

यंत्रमागधारकांची कुशलता, कामगारांची मेहनत यामुळे इचलकरंजीचे वस्त्रोद्योगात मोठी भरारी घेतली. हातमागापासून सुरू झालेला व्यवसाय आता अत्याधुनिक यंत्रमागापर्यंत पोहोचला. त्यामुळे शहरात कोट्यवधींची गुंतवणूक झाली आहे. केवळ विश्वासावर कोट्यवधी रुपयांच्या चालणार्‍या या व्यवसायात अपप्रवृत्तींनीही शिरकाव केला. त्यामुळे व्यापार्‍यांबद्दलची विश्वासार्हता कमी होत गेली. यापूर्वी शहरात अनेक व्यापार्‍यांनी कोट्यवधींचे दिवाळे काढून अनेक यंत्रमागधारकांना भिकेकंगाल केले.

दिवाळखोरीनंतर अनेक व्यापारी शहरातून परागंदा होत होते. मात्र काही वर्षांपासून दिवाळखोर व्यापारी शहरातच ठाण मांडून बसल्याचे वास्तव आहे. दिवाळखोरीनंतर काही वर्षानंतर पुन्हा व्यापार सुरू करण्याचे धैर्यही त्यांच्यात वाढले आहे. दिवाळखोरीमुळे अनेक यंत्रमागधारक नुकसानीत येत आहेत.

SCROLL FOR NEXT