Latest

कोल्हापूर : दारूच्या बाटल्या, प्लास्टिकने जंगले व्यापली!

Arun Patil

कोल्हापूर ; सागर यादव : जागोजागी पडलेल्या दारूच्या बाटल्या, बाटल्या फोडल्याने झालेला काचांचा खच, प्लास्टिक बॉटल अन् स्नॅक्सच्या पॅकेट्सचे प्लास्टिक आणि घरातील टाकाऊ वस्तूंच्या ढिगार्‍यांमध्ये जंगले, डोंगरदर्‍या अन् मुक्या जनावरांसाठीची पाणस्थळे हरवली आहेत. निसर्गाचे अपरिमित विद्रूपीकरण आजही सुरूच आहे.

वन्यप्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे कचर्‍यासह विविध प्रकारच्या समस्यांचा स्थानिक ग्रामस्थांसह वन्यप्राण्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोल्हापूर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांनी तळ ठोकला आहे. गवा, हत्ती, बिबटे व तत्सम वन्यजीव लोकवस्तीत येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याला माणूसच कारणीभूत असल्याचे वास्तव आहे. माणूस आपल्या मनोरंजनासाठी, दगदगीतून काहीकाळ विश्रांतीसाठी आणि अभ्यास व तत्सम कारणांसाठी पर्यटन करतो.

अभयारण्ये, जंगले, धरण क्षेत्र, पाणस्थळ, गडकोट-किल्‍ले अशा ठिकाणी लोक सहलीला प्राधान्य देतात. मात्र, यापैकी बहुतांशी पर्यटक स्वत:च्या मनोरंजनासाठी जंगल, पाणस्थळ परिसरात दारू पिऊन गोंधळ करतात. साऊंड सिस्टीम लावून नाच-गाणे करतात. या आवाज व आरडाओरडण्याचा त्रास जंगली प्राण्यांना सहन करावा लागतो. या आवाजाने वन्यजीव बिथरतात.

चूल पेटविल्यामुळे वणव्याची भीती

अनेक हौशी लोक निसर्गाच्या सान्निध्यात चूल मांडूण जेवण करतात. मात्र, जेवण झाल्यानंतर चूल विझवली जात नाही. अनेकजण सिगारेड, बिड्या ओढतात. यामुळे जंगल परिसरात वणवे लागण्याची भीती असते. अनेकदा लोकांच्या चुकांमुळे जंगलांना आगी लागल्या आहेत. यात वन्यप्राण्यांना नाहक जीव गमवावा लागतो.

घरात नको झालेल्या वस्तूंचे ढीग

अनेक जण शहरात कोठेही कचरा टाकता येत नसल्याने घरात नको असलेल्या वस्तूही निसर्गातच नेऊन टाकतात. यात इलेक्ट्रिक वस्तू, बांधकामाची खरमाती, तुटलेली खेळणी, कपडे, चपला, गाद्या अशा अनेक वस्तूंचा समावेश असतो. अशा कचर्‍याच्या ढिगांनी शहराबाहेरील रस्ते दुतर्फा व्यापले आहेत. हे प्रकार रोखणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने ही समस्या भीषण रूप धारण करत आहे.

जंगल, गडकोट, पाणस्थळ परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणार्‍या समस्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. लोकप्रबोधनाबरोबरच स्थानिक पातळीवर ग्रामस्थ, ग्रामपंचायत, वनविभाग, पोलिस, स्वयंसेवी संस्था या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज आहे. तरच निसर्गाच्या जतन-संवर्धनाबरोबरच वन्यजिवांचेही रक्षण करता येईल.
– अनिल चौगुले, कार्याध्यक्ष, निसर्ग मित्र परिवार

SCROLL FOR NEXT