Latest

कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेला धार्मिक महत्त्व; आज-उद्या दीपोत्सवाचे आयोजन

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे ठिकठिकाणी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा त्रिपुरारी पौर्णिमा दि. 7 नोव्हेंबरला असून दि. 8 नोव्हेंबरला खग्रास चंद्रग्रहण आहे. यामुळे काही ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव या दोन्ही दिवशी साजरा केला जाणार आहे. दरम्यान, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दि. 8 रोजी रात्री 8 वाजता, दीपोत्सव होणार आहे.

धार्मिक महत्त्व…

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपूर वात (उंच खांबावर असलेली दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते.

शिवमुद्रा प्रतिष्ठानचा पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सव

जुना बुधवार पेठेतील शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 7 नोव्हेंबरच्या रात्रीपासून ते दि. 8 नोव्हेंबरच्या सूर्योदयापूर्वी पंचगंगा नदीकाठी हा दीपोत्सव होईल. याअंतर्गत 51 हजार पणत्या लावण्यात येणार असून आतषबाजीही करण्यात येणार आहे. सप्तरंगी रांगोळ्या, लेसर शोसह पहाटे 5 वाजता 'अंतरंग' हा मराठी भाव-भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मैत्री हायकर्सतर्फे आज कात्यायनीत दीपोत्सव

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मैत्री हायकर्स व कात्यायनी देवस्थान उपसमितीतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे दि. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री कात्यायणी मंदिरात दीपोत्सव, आतषबाजी होणार आहे. यानिमित्ताने मंदिर फुलांनी सजविण्यात येणार आहे. याशिवाय मंदिराचा कलश, अमृत कुंड, तुलसी वृंदावन, परशुराम तीर्थ, हनुमान मंदिर, दीपमाळ, रेणुका मंदिर, दत्त मंदिर व परिसर 11 हजार दिव्यांनी प्रकाशित करण्यात येणार आहे.

असा होतो दीपोत्सव…

या दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाविक देवाला अर्पण करतात. याला अन्नकोट असे म्हटले जाते. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. पौर्णिमेच्या दिवशी 365 वातींपासून तयार केलेली ज्योत शिवमंदिरात प्रज्वलित केली जाते. कार्तिक महिन्यातील या दीपोत्सवात प्रज्वलित केले जाणारे दिवे हे मांगल्याचे प्रतीक मानले जातात. यामुळे दुष्ट शक्ती पळून जातात, अशी धारणा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT