कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
नाती समान असलेल्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील ५१ वर्षीय नराधमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. व्ही. जोशी यांनी गुरुवारी (दि. २३) मरेपर्यंत जन्मठेप आणि वेगवेगळ्या कलमांन्वये दंडाची शिक्षा सुनावली. यशवंत बापू नलवडे (रा. सावे ता. शाहुवाडी) असे त्याचे नाव आहे.
पन्हाळा तालुक्यात बहुचर्चित ठरलेल्या बालिकेवरील अमानुष अत्याचार खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता ॲड. मंजूषा पाटील यांनी काम पाहिले. या खटल्याच्या निकालाकडे शाहुवाडी, पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी यशवंत नलवडे याने आपल्या घराच्यालगत स्वतःच्या दोन लहान नातवंडांसाठी साडीचा झोपाळा तयार केला होता. झोपाळ्यावर खेळण्यासाठी तीन वर्षाची चिमुरडी येत होती आणि नराधमाच्या नातवंडा सोबत खेळत असे. दिनांक २८ ऑक्टोंबर २०२० मध्ये दुपारी पीडित मुलगी आरोपीच्या नातवंडात समवेत खेळण्यासाठी झोपाळ्याजवळ आली. त्यानंतर नराधमाने तिला जबरदस्तीने स्वतःच्या घरात नेऊन अमानुषपणे अत्याचार केला. याशिवाय बालिकेच्या अंगावर विविध ठिकाणी चावा घेऊन तिला गंभीररित्या जखमी केले. या अमानुष व क्रूर घटनेनंतर घाबरलेली मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत रडत घरी आली.
अंगावरचे सर्व कपडे रक्ताने माखले होते. पीडितेच्या आईने मुलीकडे चौकशी केली असता मुलीने सर्व घटनाक्रम सांगितला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी पीडितेची आई त्याच्या घराकडे आली असता, नराधमाने बालिकेच्या आईला शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली. महिलेच्या अंगावर तो धावून गेला या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली होती.
पीडितेच्या आईने शाहूवाडी पोलिस ठाणे तक्रार नोंदविल्यानंतर तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी नराधमाला बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांनी तपास करून नराधमाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. व्ही. जोशी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात १९ साक्षीदार तपासण्यात आले न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा ठोठावली.