Latest

कोल्हापूर : तिरुपती देवस्थानकडून अंबाबाईला शालू अर्पण

Arun Patil

कोल्हापूर : तिरुपती देवस्थानकडून गुरुवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्यात आला. ट्रस्टचे चेअरमन वाय. व्ही. सुब्बारेड्डी, सदस्य मिलिंद नार्वेकर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी हा शालू देवीच्या चरणी अर्पण केला. दरम्यान, मुंबईत तिरुपती देवस्थानला महाराष्ट्र सरकारकडून दिलेल्या 12 एकर जागेवर येत्या दोन वर्षांत तिरुपती तिरुमला देवस्थान ट्रस्टच्या वतीने तिरुपती मंदिराच्या धर्तीवर सुबक मंदिर उभारण्याचे प्रयत्न असल्याची माहिती वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापूर व तिरुपतीची धार्मिक, सांस्कृतिक परंपरा अखंड राहावी, धार्मिक-सांस्कृतिक पर्यटन विकासासाठी एकसंध प्रयत्न व्हावेत, यासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही सुब्बारेड्डी यांनी दिली.

'गोविंदा, गोविंदा, जय गोविंदा…' असा जयघोष करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत-गाजत शालू डोक्यावरून पदाधिकार्‍यांनी अंबाबाई मंदिरात आणला. शालूसोबतच बांगड्या, ओटी, तिरुपतीचा प्रसाद, हळद-कुंकू, फळे आदींचा समावेश होता. सोनेरी रंग व लाल काठापदराचा हा शालू सुमारे 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा आहे.

तिरुपती देवस्थानकडून नवरात्रौत्सवात देशभरातील विविध शक्तिपीठांना शालू व वस्त्रे अर्पण केली जातात. त्यानुसार अंबाबाई देवीला शालू अर्पण केला जात आहे.

वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे शालू सुपूर्द केला. यावेळी सौ. सुवर्णाम्मा सुब्बारेड्डी, हेमीरेड्डी प्रशांती, टी.टी.डी.चे सदस्य सौरभ बोरा, तिरुपतीचे मुख्य पुजारी व्यंकटेश स्वामी, सदस्य के. रामाराव, लक्ष्मीनिवास बियाणी, अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, गणेश नेर्लेकर-देसाई, अरुण दुधवडकर, संजय पवार, महेश जाधव, शैलेश बांदेकर आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT