Latest

कोल्हापूर : जीवघेणा सावकारी पाश सुटेना!

Arun Patil

कोल्हापूर ; गौरव डोंगरे : सावकारांच्या जाचातून सुटण्यासाठी एका बिल्डरने स्वत:च्या अपघाती मृत्यूचे कुभांड रचले. स्वत:च्या महागड्या विम्यातून का होईना सावकारांचे कर्ज भागेल, अशी त्याची समजूत होती; पण त्याने यासाठी एका निरपराध मजुराचा खून करून तो स्वत:च असल्याचे भासवत यंत्रणेला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी घडली होती. हे सगळे असले, तरी सावकारी मात्र तिथेच तग धरून आहे. सावकारांच्या या पाशातून सुटका होणार का? असा प्रश्न उभा आहे.

महापालिकेच्या कंत्राटी कामगाराने सावकारांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपवले. याप्रकरणी पाच खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सावकारांकडून घेतलेल्या पैशांपोटी मृताला स्वत:चे घर, प्लॉट गमावण्याची वेळ आली. या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यातील सावकारीचे भयावह चित्र समोर आले आहे.

सावकारांची नोंद बोटावर मोजण्याइतकीच

जिल्ह्यात खासगी सावकारांचे पेव फुटले असले, तरी उपनिबंधक कार्यालयाकडे केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत सावकारांची नोंद आहे. त्यातही जर तक्रार आली तरच कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे.

आत्महत्येचे टोक

सावकारांकडून होणारा जाच, शेतजमिनी-राहते घर जाण्याची चिंता, अपमानास्पद वागणूक, समाजात होणारी बदनामी याला कंटाळून आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याच्या घटना घडल्या आहेत. बांधकाम क्षेत्रात मोठे नाव असणारे बिल्डरही यातून बचावलेले नाहीत.

भिशीआडून सावकारी

भिशीच्या नावाने खासगी सावकारीचा प्रकार सर्वत्र जोमात आहे. चांगल्या नावाने भिशी सुरू करून यातील पैसे व्याजाने फिरवणे, लिलावातून जादा पैसे आकारून एखाद्याला भिशी देण्यातूनही सावकारीला बळ देण्याचे काम सुरू आहे.

गुन्हेगारीला बळ

वसुलीसाठी गुंडांची फौज नेमून कर्ज घेणार्‍यांचा पिच्छा पुरवला जातो. दारू, पैसे देऊन तरुणांना अशा वसुलीची कामे दिली जातात.

बेरोजगारीने त्रस्त

असणार्‍या अनेकांनी सध्या हा झटपट पैशांचा मार्ग अवलंबला असून, यातून गुन्हेगारीला बळ देण्याचे काम सुरू आहे.

सरकारी कार्यालयांतील सावकारी

महानगरपालिकेतील आरोग्य विभाग, सीपीआरमधील सफाई कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेतील चतुर्थश्रेणी कर्मचारीही काही सावकारांच्या पाशात अडकलेले आहेत. या कर्मचार्‍यांचे पगार जमा होणार्‍या खात्यांची एटीएम कार्डेच या सावकारांच्या खिशात असल्याचे दिसून येते.

महापालिकेचे वेध

पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर असल्याने काही खासगी सावकारांनाही आता 'व्हाईट कॉलर' बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अशा सावकारांनी वसुलीची यंत्रणाही सक्षम करण्यास सुरुवात केली असून, प्रभागातील अडलेल्यांना पैसे पुरवून सहानुभूती मिळविण्याचे त्यांचे फंडे सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT