Latest

कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार 600 कोटींचा मोबदला

Arun Patil

कोल्हापूर; अनिल देशमुख : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला म्हणून जिल्ह्यातील सुमारे 3 हजार शेतकर्‍यांना 600 कोटी रुपये मिळणार आहेत. आजअखेर 50 कोटी 81 लाख रुपयांचे शेतकर्‍यांना वाटप झाले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया गतीने सुरू असून, निवाडे जसे मंजूर होतील, तशी मोबदल्याची रक्‍कम संबंधितांच्या खात्यावर जमा केली जात आहे.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 49 गावांतून जात आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील 25, पन्हाळा तालुक्यातील 10, करवीर तालुक्यातील 8, तर हातकणंगले तालुक्यातील 6 गावांचा समावेश आहे. या गावांतील एकूण 289 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात 28 गावांतील 136 हेक्टरचे, तर दुसर्‍या टप्प्यात 21 गावांतील 153 हेक्टरचे संपादनाचे काम केले जाणार आहे. भूसंपादनाच्या कामाने सध्या गती घेतली आहे. या कामासाठी सहा गावांचे निवाडे पूर्ण झाले आहेत. या गावांतील जमीन संपादित होणार्‍या शेतकर्‍यांना आजअखेर 50 कोटी 81 लाख रुपये मोबदला म्हणून दिले आहेत. उर्वरित गावांतील जसे निवाडे होतील, त्यानुसार मोबदला देण्यात येत आहे. मोबदल्याची ही एकूण आकडेवारी 600 कोटींपर्यंत जाईल, अशी शक्यता आहे.

जावयांचाही मोबदल्यावर डोळा

शेतकर्‍यांना मिळणार्‍या या मोबदल्यावर आता काही जावयांचाही डोळा असल्याचे चित्र आहे. मुलीचाही हक्‍क असल्याचे सांगत काहींनी मोबदल्यातील रक्‍कम समान मिळावी यासाठी तक्रारी केल्या आहेत. एकाने तर लग्‍नाचा व्हिडीओच अधिकार्‍यांना पाठवला आहे. यामध्ये मुलीच्या कन्यादानालाही वडील आले नाहीत, तर त्यांना मुलीचा हिस्सा का सोडावा, अशी विचारणा संबंधित जावयाने अधिकार्‍यांकडे केली आहे.

भूसंपादनाच्या पैशांच्या वादातून खून

भूसंपादनाचे पैसे मिळू लागले आहेत. अनेक शेतकर्‍यांना लाखो रुपयांपासून अगदी कोटीपर्यंत ही रक्‍कम जात आहे. मोठ्या प्रमाणात पैसे मिळू लागल्याने आता वादही वाढू लागले आहेत. एकमेकांविरोधात तक्रारीही वाढत आहेत. या महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनातूून मिळालेल्या रकमेच्या वादातून आवळीपैकी पोवारवाडी (ता. पन्हाळा) येथे 70 वर्षीय वृद्धाचा रविवारी रात्री खून झाला आहे.

SCROLL FOR NEXT