Latest

कोल्हापूर जिल्ह्यात 480 ग्रामपंचायतींत लवकरच निवडणुकीचा धुरळा

Arun Patil

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. सार्वत्रिक निवडणुका होणार्‍या या ग्रामपंचायतींपैकी 410 ग्रामपंचायतींची ओबीसी आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मान्यता दिली आहे. 70 ग्रामपंचायतींत आवश्यक ओबीसी लोकसंख्या नाही. यामुळे या ग्रामपंचायतींत ओबीसी आरक्षण काढण्यात आलेले नाही. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार्‍या या ग्रामपंचायतींत कोल्हापूर शहरालगतच्या तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यात जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या पाच, तर डिसेंबर 2021 ते डिसेंबर 2022 पर्यंत मुदत संपणार्‍या 475 ग्रामपंचायती अशा एकूण 480 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया आयोगाने सुरू केली आहे. या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम सुरू होते. जिल्हाधिकार्‍यांनी या 480 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती व जमाती, महिला सवर्ग आणि ओबीसी अशा आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना जाहीर केली.

प्रभाग रचना अंतिम झाल्याने आता सरपंच आरक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. पावसाळा संपताच या निवडणुका होतील अशी शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसांत या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. निवडणुका होणार्‍या गावात महत्त्वाची गावे असल्याने जिल्ह्यात यानिमित्ताने राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार आहे.

कोल्हापूरलगतच्या गावांत रणधुमाळी

निवडणूक होणार्‍या गावांत कोल्हापूर शहरालगतच्या प्रमुख गावांचा समावेश आहे. यामध्ये शिंगणापूर, उजळाईवाडी, पाचगाव, आंबेवाडी, उचगाव, वळिवडे, कंदलगाव, वसगडे, वडणगे, कळंबा, मोरेवाडी, सरनोबतवाडी, गांधीनगर आदी गावांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT