Latest

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या 2015 ते 2021 काळातील संचालकांची ईडी चौकशी?

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या चौकशीचा भाग म्हणून जिल्हा बँकेवरही नुकताच छापा घालण्यात आला होता. यामध्ये ब्रिक्स कंपनीला मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. कर्ज समितीच्या तत्कालीन तीन माजी संचालकांना नोटीस पाठविण्यात आली आहे. कर्जाला बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही मंजुरी द्यावी लागते. त्यामुळे या कर्जाला मंजुरी दिलेल्या सर्व संचालकांनाही चौकशीसाठी ईडीची नोटीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानासह सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व पुणे येथील घरावर जानेवारी महिन्यात छापा घातला होता. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील व्यवहाराच्या चौकशीसाठीही दि.1 फेब—ुवारी रोजी जिल्हा बँकेवर छापा टाकला होता. शाहूपुरीतील बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी व गडहिंग्लज शाखेवर त्यावेळी छापे टाकण्यात आले होते. तसेच संताजी घोरपडे साखर कारखान्यावरही ईडीचे पथक गेले होते. तीस तासांच्या तपासणीनंतर ईडीने बँकेतील काही कागदपत्रे जप्त करून ती तपासणीसाठी नेली होती.

मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या बहुचर्चित ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्जाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या वतीने एखादे कर्ज प्रकरण मंजूर करताना प्रथम ते कर्ज समितीसमोर मंजुरीसाठी ठेवावे लागते, त्यानुसार ब्रिक्स कंपनीला कर्ज मंजूर करणार्‍या कर्ज समितीतीतील तत्कालीन तीन सदस्यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. ईडीने पहिल्यांदा ही नोटीस जिल्हा बँकेला पाठविली. त्यानंतर बँकेकडून ती सदस्यांना पाठविल्याचे समजते.

बँकेच्या कर्ज समितीने ब्रिक्स कंपनीचे कर्ज मंजूर केल्यानंतर त्याला संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ब्रिक्स कंपनीचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आले. त्यामुळे या बैठकीस हजर असणार्‍या सर्व संचालकांनाही ईडीमार्फत नोटीस पाठविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT