कोल्हापूर ; सतीश सरीकर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून कै. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील निवडणुकीचे पडसाद पोटनिवडणुकीत उमटत आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेतून दबाव आहे.
परंतु; महाविकास आघाडी असल्याने 'मातोश्री'वरून जाहीर होणारा निर्णयही क्षीरसागर यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. भाजपने श्रीमती जाधव यांना भाजपची उमेदवारी घेण्यासाठी गळ घातली असल्याने भाजप निवडणुकीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परिणामी पोटनिवडणूक बिनविरोध होणार की रणधुमाळी माजणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपबरोबर आघाडी केली. परिणामी शिवसेनेने निवडणुकीत चांगलीच झुंज दिली. जिल्हा बँक निवडणुकीचे पडसाद येत्या काही वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणावर पडणार हे निश्चित आहे. त्याची सुरुवात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीद्वारे होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाणार की जिल्हा बँकेसारखे एकमेकांविरुद्ध रणांगणात उतरणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्रीमती जाधव यांची भेट घेऊन त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न केले. परंतु; श्रीमती जाधव यांनी त्यास नकार दिला आहे. भाजपमधून निवडणूक लढण्यास काहीजण इच्छुक आहेत. सोशल मीडियावर त्यासंदर्भात पोटनिवडणूक लढविणारच अशा फोटोसह पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा अनुभव पाहता भाजप कोल्हापूरचीही पोटनिवडणूक ताकदीने लढण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मतदारसंघाच्या स्थापनेपासून अपवाद वगळता कोल्हापुरात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी 2009 व 2014 अशा दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2019 मध्ये काँग्रेसचे आ. चंद्रकात जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद दिले. पराभवानंतरही क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडून विविध खात्यांचा निधी आणून आपली तयारी सुरू ठेवली आहे.
शिवसैनिकांचे 'मातोश्री'च्या आदेशाकडे लक्ष
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक एकत्रित लढविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. परंतु; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी श्रीमती जाधव यांना मिळाल्यास शिवसेनेची भूमिका काय असणार? याकडे नजरा लागल्या आहेत.
गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ व केडीसीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेला दुजाभावाची वागणूक दिल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी राहण्यापेक्षा स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरावे यासाठी स्थानिक शिवसैनिकांचा आग्रह आहे. परिणामी 'मातोश्री'वरून शिवसैनिकांना कोणता आदेश येतो? याकडे लक्ष लागले आहे.