Latest

‘कोल्हापूर उत्तर’ चा गुलाल कुणाला?

अमृता चौगुले

कोल्हापूर; सुनील सकटे : अत्यंत अटीतटीने आणि चुरशीने झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत गुलाल कुणाला लागणार, याकडे कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा लढतीत विजयाचा गुलाल कोण उधळणार, याबाबत विविध पैजा लागल्या असून कार्यकर्त्यांचा भर आता मतांच्या आकडेमोडीवर आहे.

आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. केवळ एका विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक असली तरी या निवडणुकीस विविध अंगांची झालर आहे. कागदोपत्री तब्बल 15 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रत्यक्षात भाजपचे सत्यजित कदम विरुद्ध काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्यात दुरंगी लढत झाली. राज्यातील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांचा टोकाचा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने भाजपच्या मनात प्रचंड चिड आहे. भाजपचा शिवसेनेवरील रोष या निवडणुकीत पावलोपावली दिसून आला.

तसे पाहता या मतदारसंघावर बरीच वर्षे शिवसेनेचे वर्चस्व राहिल्याने हा भगव्याचा बालेकिल्ला मानून भाजपने आपला भगवा अधिक प्रकर्षाने पुढे आणला. भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेशी करून राज्यातील बहुतेक नेते प्रचारास आणले. केवळ नेतेच नाही तर कार्यकर्त्यांचा संच शहरात वातावरण निर्माण करून गेला. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून अधिकाधिक मतदान होईल, याची विशेष दक्षता घेतली. यामध्ये भाजपने महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रीत केले. भाजप हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटत असताना काँग्रेसने कोल्हापूरच्या जनतेच्या स्वाभिमानास हात घालून ही निवडणूक भावनिक केली. त्यामुळे हिंदुत्व विरुद्ध स्वाभिमान असाच प्रचार झाला.

विकासाचा मुद्दा बाजूला

हिंदुत्व, स्वाभिमान, भ—ष्टाचार, आरोप-प्रत्यारोप करीत दगडफेकीपर्यंत प्रचार पोहोचला. दगडफेकीवरून चिखलफेकीवर प्रचार गेल्याने विकासाचा मुद्दा बाजूला गेला. त्याचाही परिणाम मतांच्या आकडेवारीवर दिसून आला. या निवडणुकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार उदयनराजे भोसले, चित्रा वाघ अशा दिग्गजांच्या प्रचारसभा झाल्या. तर महाविकास आघाडीने पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह दिग्गजांनी मैदान मारले.

दोन्ही बाजूंनी प्रचंड ताकद लावून झालेल्या या निवडणुकीत प्रचारात चुरस दिसली तरी मतदानात मात्र निरुत्साहच अधिक दिसून आला. त्यामुळे केवळ 61 टक्के मतदान झाले. दोन्ही बाजूने आपलाच विजय असल्याचा दावा केला जात आहे. मतदानाची आकडेवारी पाहता दोघांपैकी कुणाला मतदार कौल देणार, याकडे लक्ष लागले आहे. मतदानाची आकडेवारी पाहता उच्चभ्रू वस्तीतील मतदानात घट झाल्याचे दिसून येते. तर अनेक ठिकाणी दोन्ही उमेदवारांच्या बाजूने कल असल्याने प्रत्यक्ष मतदान यंत्रात कोणाचे पारडे जड होणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

आजी-माजी पालकमंत्र्यांत बाजी कोणाची?

निवडणुकीच्या निमित्ताने दोन आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. महाडिक विरुद्ध सतेज पाटील या संघर्षाची झालरही या निमित्ताने पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी जेवणांसह रोख रकमेच्या पैजा लागल्या आहेत. कोणत्या भागात किती मतदान झाले, यापैकी आपले किती, याची आकडेमोड करण्यात आजही कार्यकर्ते व्यस्त आहेत. माजी नगरसेवकांसह भावी नगरसेवकांनीही या ठिकाणी आपले कसब पणाला लावले आहे. दोन माजी नगरसेवकांत गुलाल कुणाला लागणार, याकडे लक्ष लागले आहे. दक्षिण काशीत दख्खनचा राजा जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरू असणार्‍या या राजकीय रणधुमाळीत गुलाल कोण उधळणार, याची उत्सुकता आहे.

SCROLL FOR NEXT