Latest

कोल्हापूर : आजपासून दोन दिवस ऊसतोड व वाहतूक बंद

दिनेश चोरगे

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा केलेला कायदा रद्द करावा, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. 17) व शुक्रवारी (दि. 18) राज्यात ऊसतोड बंद व वाहतूक बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर साखरेचा खरेदी दर 3 हजार 100 रुपयांवरून 3 हजार 500 रुपये करावा. इथेनॉलच्या दरात वाढ करावी, साखर कारखानदारांनी आपला हिशेब सादर करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी व शुक्रवारी जेथे ऊसतोड व वाहतूक दिसेल तेथे आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन तीव— असेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

कारखान्यांचा हिशेब तपासला पाहिजे, या मागणीवर ऑक्टोबरअखेर सर्व कारखान्यांना हिशेब सादर करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या होत्या. मात्र, अद्याप कारखान्यांनी हिशेब सादर केलेला नाही. सर्व साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढले असले, तरी दरात ते मागे आहेत. एफआरपीवर 200 रुपये जादा देणे शक्य असल्याचा दावा स्वाभिमानीने केला आहे.

पूर्वी केवळ साखर, बगॅस, मोलॅसिस यावर आधारित एफआरपी निश्चित केली जात होती. मात्र, आता इथेनॉलसह अन्य उपउत्पादने घेतली जातात. त्याचा विचार करून एफआरपी निश्चित होणे आवश्यक आहे. त्यासाठी मूल्यनिश्चिती समितीची स्थापना करावी, ऊसतोडणी मजुरांची गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाकडे नोंदणी करून त्यांच्यामार्फत कारखान्यांना मजूर पुरवावेत, अशी स्वाभिमानीची मागणी आहे. यासाठी हे आंदोलन होणार आहे.

SCROLL FOR NEXT