कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर स्पोर्टस् क्लब (केएससी) व रगेडियन क्लब आयोजित कोल्हापूर अल्ट्रा रन मॅरेथॉन रविवार, दि. 24 एप्रिल रोजी पोलिस मैदान येथून सुरू होणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना रगेड कब किड्स फिटनेस अॅकॅडमी, तावडे लॉन मेमोरियल चर्चच्या मागे, सासने ग्राऊंड येथे सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत किटचे वाटप सुरू करण्यात आले असून सहभागी स्पर्धकांनी आपले किट घेऊन जाण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. किटमध्ये टी-शर्ट, बिब, गुडी बँक, टाईम चिपचा समावेश असणार आहे.
नवोदित खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने 'वायू डाइनटेक अॅप', 'एस. जे. आर. टायर्स', दै. 'पुढारी' व 'टोमॅटो' एफएम व विविध संस्थांच्या सहकार्याने ही मॅरेथॉन होणार आहे. कोल्हापूर अल्ट्रा रन मॅरेथॉनची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गेल्या चार रविवारी सहभागी स्पर्धकांनी या प्रॅक्टिस रनमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
खेळाबरोबरच मनोरंजनही…
मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांना झुंबा, नाशिक बेल, रॉक बँड, पोलिस बँड, मर्दानी खेळ, ढोल-ताशा, पारंपरिक लेझीम, वाद्य, डी. जे. बिटस् आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. स्पर्धेसाठी विबग्योर स्कूल, अशोकराव माने महाविद्यालय, डी. वाय. पी. तळसंदे कॉलेज स्कूल, नरके स्कूल, संजीवन पन्हाळा व कदमवाडी, सेंट झेवियर्स, माईसाहेब बावडेकर, फोर्ट इंटरनॅशनल स्कूल यांचे सहकार्य लाभले आहे.
सिद्धिविनायक नर्सिंग होम व डी.वाय. पाटील. एज्युकेशनल सोसायटी मेडिकल हेल्थसाठी सहकार्य करणार असून चार रुग्णवाहिका दक्ष असणार आहेत. याशिवाय स्पर्धा मार्गावर सुमारे 200 स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत.
स्थिर जीवनशैली सक्रिय करण्यासाठी 'आयसीआयएल' आपल्या कर्मचार्यांना रनमध्ये सहभागी करणार आहे. शारीरिक तंदुरुस्ती हा एक बोनस आहे. यामुळे आळशी -निष्क्रिय जीवनशैलीची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर अल्ट्रा रन मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन निरोगी राहण्याचे आव्हान पेलणार आहे.
– शैलेश सरनोबत, वरिष्ठ उपाध्यक्ष, आयसीआयएल