Latest

लखनौचा खेळ खल्लास! जिगरबाज बेंगलोर विजयी

मोनिका क्षीरसागर

कोलकाता : वृत्तसंस्था

भेदक गोलंदाजी आणि रजत पाटीदार याने झळकावलेले नाबाद शतक यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने बुधवारी एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपर जायंटस्ला स्पर्धेबाहेर करून टाकले. हा सामना बेंगलोरने 14 धावांनी खिशात टाकला. आता बेंगलोरची लढत दुसर्‍या क्वालिफायरमध्ये राजस्थानशी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 27 रोजी होईल. त्यातील विजयी संघ येत्या 29 तारखेला अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी भिडेल.

बेंगलोरने दिलेले 208 धावांचे लक्ष्य लखनौला पेलवले नाही. त्यांना निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 193 धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार लोकेश राहुल एकटा लढला असेच लखनौच्या डावाचे वर्णन करावे लागेल. राहुलने 79, दीपक हुड्डाने 45 तर ममन होराने 19 धावांचे योगदान दिले. बेंगलोरकडून जोश हेझलवूड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 43 धावांत 3 मोहरे टिपले. तसेच हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी गारद केला.

त्यापूर्वी लखनौचा कर्णधार लोकेश राहुल याने नाणेफेक जिंकून बेंगलोरला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रजत पाटीदारने झळकावलेल्या झणझणीत शतकाच्या बळावर बेंगलोरने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 207 धावांचा डोंगर उभारला. त्यांची सुरुवात धक्‍कादायक झाली. सलामीवीर आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस याला मोहसीन खानने भोपळाही फोडू दिला नाही. यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने त्याचा झेल टिपला. फलकावर तेव्हा अवघ्या 4 धावा लागल्या होत्या. दुसरा सलामीवीर विराट कोहली याने 24 धावांची चटपटीत खेळी केली. तोही फार काळ टिकू शकला नाही. त्याला आवेश खानने तंबूत पाठवून दिले. रजत पाटीदार याने मात्र नांगर टाकला आणि गरजेनुसार कधी संयमी तर कधी आक्रमक फलंदाजी केली. ग्लेन मॅक्सवेलकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. त्याला स्थिरावण्यापूर्वीच कृणाल पंड्याच्या फिरकीने गिरकी घ्यायला लावली. मॅक्सवेलने 9 धावा केल्या. पाठोपाठ महिपाल लोमरोर हाही 14 धावा केल्यानंतर रवी बिश्‍नोईच्या फिरकीवर चकला.

ठरावीक अंतराने गडी बाद होत गेल्यामुळे बेंगलोरच्या धावसंख्येला खीळ बसत गेली. पंधरा षटकांचा खेळ पूर्ण झाला तेव्हा बेंगलोरने 4 गड्यांच्या मोबदल्यात 123 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर बेंगलोरने टॉप गिअर टाकला. सोळाव्या षटकात रवी बिश्‍नोईची पाटीदारने जबरदस्त धुलाई केली. दोन चौकार आणि तीन षटकार खेचून पाटीदारने शतकाच्या दिशेने झेप घेतली. मग दिनेश कार्तिकने आवेश खानच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या त्या तीन चौकार ठोकून. त्यानंतरही त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. 37 धावांचे योगदान कार्तिकने दिले.

पाटीदार चौथा शतकवीर

यंदाच्या आयपीएलमध्ये रजत पाटीदार हा शतक ठोकणारा तिसरा खेळाडू ठरला. त्याची ही आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी होय. जोस बटलर, लोकेश राहुल व क्विंटन डीकॉक हे यंदाचे अन्य शतकवीर आहेत. रजतने 112 धावांची बहुमूल्य खेळी केली. 54 चेंडूंचा सामना करताना त्याने डझनभर चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT