Latest

कोरोना : सांगली जिल्ह्यात प्रशासनाकडून पाच हजार बेडस् सज्ज

अमृता चौगुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयात 5 हजार 299 बेडस् तयार ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 1 हजार 200 बेड आयसीयूचे, 3 हजार 638 ऑक्सिजनचे बेडस् आणि 461 हे सर्वसाधारण बेडस् आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. डिसेंबर महिन्यात आठवड्यात 40 ते 50 रुग्ण कोरोनाचे आढळत होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत 134 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 298 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैकी केवळ 176 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. बाधित 122 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपचारासाठी खासगी आणि सरकारी रुग्णालये तयार ठेवली आहेत. त्याठिकाणी लागणार्‍या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा क्रीडा संकुल पुन्हा होणार कार्यान्वित

जिल्हा परिषदेमार्फत प्रामुख्याने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो रुग्णांना याचा फायदा झाला होता. रुग्ण संख्या कमी झाल्याने येथील उपचार बंद करण्यात आले होते. मात्र वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथे सर्व व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. रुग्ण संख्या वाढलीच तर येथे पुन्हा उपचार सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात 56 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध

कोरोनाच्या दोन्ही लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढली होती. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून ठेवणे गरजेचे आहे. सध्या कोरोना आणि नॉन कोव्हिड रुग्णालयातून जिल्ह्यात दिवसाला 5 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. सध्या 56 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा आहे. मागणी वाढल्यास जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT