कोल्हापूर ; अनिल देशमुख : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) कमी होऊ लागले आहे. तीन दिवसांपूर्वी 10.24 टक्के इतका असलेला 'पॉझिटिव्हिटी रेट' शनिवारी 2.57 टक्क्यापर्यंत खाली आला. जिल्ह्यातील रुग्णसंख्येतही घट होत चालली असून अनेक दिवसांनंतर प्रथमच सक्रिय रुग्णसंख्या एक हजारांपेक्षा खाली आली आहे. हे दिलासादायक चित्र असून जिल्ह्यात तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचे हे संकेत मानले जात आहेत.
जिल्ह्यात पहिल्या आणि दुसर्या लाटेत कोरोनाचे थैमान होते. तिसर्या लाटेतही रुग्णसंख्या वेगाने वाढत गेली. तिसर्या लाटेत प्रारंभी मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले; मात्र काही काळ दैनंदिन मृत्यूची संख्या पाचच्या पुढे राहिली. यामुळे तिसरी लाटही धोकादायक ठरते की काय, अशी भीती निर्माण होण्याची शक्यता असतानाच जिल्ह्यात या तिसर्या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
जिल्ह्यात तिसर्या लाटेत कोरोनाबाधितांचे प्रमाण अगदी 25 टक्क्यांच्या वर गेले होते. म्हणजे चाचणी केलेल्या 100 रुग्णांपैकी 25 पेक्षा अधिक रुग्ण कोरोनाबाधित आढळून येत होते. कोरोनाबाधितांचे प्रमाण जितके जास्त तितका संसर्ग अधिक असे मानले जाते. यामुळे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात संसर्गाचे प्रमाण अधिकच होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
पॉझिटिव्हिटी रेट आला 2.57 टक्क्यांपर्यंत खाली
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्क्यांवर होता. दि. 10 फेब्रुुवारी रोजी तो 10.24 टक्के इतका नोंदवला गेला. त्यानंतर दि.11 रोजी हे प्रमाण 3.67 टक्क्यांपर्यंत खाली आले. दि.12 रोजी हाच रेट 2.57 टक्के इतका राहिला. पॉझिटिव्हिटी रेटचे प्रमाण असेच कमी होत गेले, तर येत्या दोन-तीन आठवड्यांत जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण अत्यंत कमी होईल. परिणामी, जिल्ह्यातील निर्बंध आणखी कमी होऊन पुढील महिन्यात जिल्हा पूर्ण ऑनलॉकही होईल, अशीही शक्यता आहे.
निर्बंध आणखी शिथिल होणार
जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. लसीकरणातही राज्यातील आघाडीवर असलेल्या पहिल्या 11 जिल्ह्यांत कोल्हापूरचा समावेश आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध जिल्हा प्रशासनाने कमी केले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी निर्बंध शिथिल होणार आहेत.
सक्रिय रुग्णसंख्याही आली एक हजाराखाली
पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने दैनंदिन सक्रिय (अॅक्टिव्ह) रुग्णसंख्येत तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णसंख्येतही घट होत चालली आहे. दि. 23 जानेवारी रोजी तिसर्या लाटेतील सर्वाधिक 4 हजार 536 सक्रिय रुग्णांची नोंद झाली. यानंतर ती कमी होत गेली. दि.1 फेब्रुवारी रोजी हीच संख्या 3 हजार 426 पर्यंत खाली आली होती. दि.12 फेब्रुवारी रोजी ही संख्या एक हजाराखाली आली. शनिवारी दिवसभरात सक्रिय रुग्णांची संख्या 925 इतकी होती.