Latest

कोयना धरणात वीजनिर्मितीसाठी १० टीएमसी कोटा वाढवला

Arun Patil

पाटण ; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणात केवळ 42.78 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिम जलविद्युतनिर्मितीसाठी लवादाच्या आरक्षित कोट्यापैकी आता केवळ 0.64 टीएमसी कोटा शिल्लक असल्याने येत्या चोवीस तासांत तो संपुष्टात येणार आहे. त्यानंतर विजेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन शासनाने कोयना धरणातील अतिरिक्त दहा टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरास परवानगी दिली आहे. त्यामुळे 31 मेअखेर चालू तांत्रिक वर्षाअखेरपर्यंत आगामी चाळीस दिवसांचे भवितव्य हे अवघ्या दहा टीएमसी पाण्यावर अवलंबून आहे.

दुर्दैवाने राज्यात पुन्हा मोठ्या प्रमाणावर कोळसा तुटवडा झाला, तर कोयनेतील या अतिरिक्त दहा टीएमसी पाण्यावर अपेक्षित वीजनिर्मिती शक्य नाही. त्यामुळे आगामी काळातही भारनियमनाची टांगती तलवार कायम डोक्यावर राहणार, हेच या तांत्रिक व नैसर्गिक अडचणीतून स्पष्ट होत आहे .

कोयना धरणातील 105 टीएमसी पाण्यापैकी पश्चिमेकडील तब्बल 1920 मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पांसाठी 1जून ते 31 मे या तांत्रिक वर्षासाठी लवादाकडून 67.50 टीएमसी पाणी आरक्षित आहे. लवाद आरक्षणानंतर अपवादात्मक वर्षात ज्यादा पाणीवापर झाला; परंतु यावर्षी राज्यात सातत्याने कोळशाचा तुटवडा झाल्याने अनेकदा त्याचा कोयना वीजनिर्मितीवर अतिरिक्त ताण आला.

पश्चिमेकडे पाण्याचा सातत्याने मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याने ऐन उन्हाळ्यात सर्वाधिक वीज मागणीच्या काळात येथे पाण्याअभावी वीजनिर्मिती ठप्प होण्याची भीती होती. लवादाच्या आरक्षित 67.50 टीएमसीपैकी आतापर्यंत तब्बल 66.86 टीएमसी पाणीवापर झाल्याने आता आरक्षित केवळ 0.64 टीएमसी इतकाच अधिकृत कोटा शिल्लक असून येत्या चोवीस तासांत तोही संपुष्टात येईल. त्यानंतर पाण्याअभावी पश्चिमेकडील वीजनिर्मिती बंद

पडू नये म्हणून धरणातील शिल्लक पाण्यापैकी पंधरा टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी झाली. त्यापैकी दहा टीएमसी अतिरिक्त पाणी देण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार 31 मे पर्यंत येणार्‍या चाळीस दिवसांसाठी या दहा टीएमसी पाण्याचा अतिरिक्त वापर करून त्यातूनच पश्चिमेकडे वीजनिर्मिती केली जाणार आहे.

SCROLL FOR NEXT