Latest

केंद्राच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी अंबाबाई तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव द्या : सतेज पाटील

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या 'प्रसाद' योजनेसाठी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा प्रस्ताव द्या, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात पर्यटन विकासाबाबत आयोजित बैठकीत शाहू महोत्सव आणि दसरा महोत्सव सुरू करण्याबाबत नियोजन करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.

राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे जिल्ह्याचा पर्यटन विकास कसा करता येईल, याबाबत सोमवारी बैठक झाली. पालकमंत्री पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या इंडिया टूरिझमचे सहायक संचालक जितेंद्र जाधव, राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाच्या उपसंचालक सुप्रिया करमकर या प्रमुख उपस्थित होत्या.

जितेंद्र जाधव यांनी केंद्र शासनाच्या पर्यटनविषयक योजनांची माहिती देताना 'प्रसाद' योजनेंतर्गत 50 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध होऊ शकतो, असे सांगितले. यासह 'स्वदेश दर्शन' योजनेंतर्गतही कोल्हापूरला निधी मिळेल. तसेच अन्य विविध योजनांतून कोल्हापूरला निधी उपलब्ध करून घेण्याची संधी असल्याचे सांगितले. त्यावर अंबाबाई तीर्थक्षेत्राचा 'प्रसाद' योजनेंतर्गत तातडीने प्रस्ताव सादर करा, त्याचा पाठपुरावा करा, असे आदेश सतेज पाटील यांनी दिले.

जिल्ह्याचे पर्यटनविषयक कॅलेंडर तयार करा, त्यानुसार पर्यटनविषयक उपक्रम, योजना राबवा, असे सांगत जिल्ह्यात यापूर्वी साजरा केला जाणारा दसरा महोत्सव, शाहू महोत्सव पुन्हा सुरू करण्याबाबत नियोजन करा, असेही पाटील यांनी सांगितले.

पर्यटन विकासासाठी वेेगवेगळ्या योजनांवर काम करता येणार आहे. त्यानुसार मार्चअखेर जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी लवकर प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. या बैठकीला महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT