Latest

केंद्र, राज्यात भाजपचे सरकार येईल : सुरेश हाळवणकर

अमृता चौगुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : आगामी 2024 मध्ये राज्यात आणि केंद्रात भाजप स्वबळावर सत्तेत येईल. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच होईल. आगामी कालखंड भाजपाचाच असेल, असे मत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केले. ते येथील भावे नाट्यमंदिरात आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन आठ वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल रविवारी सांगलीत भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी हाळवणकर बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार विलासराव जगताप, भगवानराव साळुंखे, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते.

हाळवणकर म्हणाले, 2014 व 2019 च्या निवडणुकीत 22 कोटी जनतेने भाजपला मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता प्रचंड वाढली. महाराष्ट्रातही भाजपला जनादेश मिळाला होता. मात्र, महाविकास आघाडीने या जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडीचे सरकार बनवले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दगाबाजी करुन जनतेचा अपमान केला. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुध्दिचातुर्याने सहाव्या जागेवर विजयाची मोहर लावली.

पृथ्वीराज देशमुख म्हणाले, केंद्र सरकारने देशातील सर्व व्यवहार ऑनलाईन केले आहेत. येणारा पैसा लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा होत आहे. केंद्राच्या या योजना कार्यकर्त्यांनी जनतेपुढे पुराव्यासह मांडाव्यात व आगामी सर्व निवडणुकांसाठी मतदान नोंदणी करण्याचे आवाहन केले.

आ. खाडे म्हणाले, मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत देशात खूप योजना राबवल्या. मोदींनी पारदर्शीपणे कारभार केला. राज्य सरकारच्या बाबतीत जनतेत असंतोष आहे. राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेलाही मोठा चमत्कार करून विरोधकांना सळो की पळो करुन सोडणार आहे. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार विलासराव जगताप, नीता केळकर, डॉ. रवींद्र आरळी, मुन्ना कुरणे यांनी मनोगत व्यक्त केले.

अविनाश मोहिते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भारती दिगडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, राजाराम गरुड, शेखर इनामदार, स्वाती शिंदे, सत्यजीत देशमुख, पृथ्वीराज पवार यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT