Latest

कुस्तीचे मारेकरी!

Arun Patil

क्रीडा क्षेत्रातील राजकारण देशासाठी नवीन नाही, किंबहुना खेळ कमी आणि राजकारणच जास्त असल्याचे बघायला मिळते. क्रीडा संघटनांच्या निवडणुकांच्या निमित्ताने हे राजकारण वेळोवेळी उफाळून वर येत असते. संघटनांवरील वर्चस्वासाठी राजकीय नेत्यांमधील संघर्ष आणि संगनमत अशा दोन्हींचे दर्शन घडत असते; परंतु क्रीडा संघटनेच्या अध्यक्षांकडून खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाने देशाच्या क्रीडा जगतात भूकंप झाला! राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक खेळाडूंनी धरणे आंदोलन सुरू केले.

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेले तीन खेळाडू, तसेच विश्वविजेतेपद मिळवलेले दोन खेळाडू या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष, खासदार बृजभूषण सिंह हुकूमशाही करीत असल्याच्या आरोपाबरोबरच त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप या खेळाडूंनी केले. त्यामुळे हे प्रकरण एका नाजूक वळणावर येऊन ठेपले. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या खासदारावर हे आरोप झाल्यामुळे आणि आरोप करणार्‍यांमध्ये आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवणारे खेळाडू असल्यामुळे खळबळ उडणे स्वाभाविक होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला विरोध केल्यामुळे ते मधल्या काळामध्ये चर्चेत आले होते, हे महाराष्ट्राला चांगलेच स्मरत असेल. आरोप करणारे खेळाडू नामांकित असल्यामुळे केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाला त्याची दखल घ्यावी लागली. आंदोलन करणार्‍या खेळाडूंशी दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. खरेतर हा विषय फक्त कुस्ती आणि क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नाही. देशाच्या एकूण क्रीडा संस्कृतीच्या दृष्टीने हा गंभीर विषय आहे. अनेक खेळांमध्ये मोठ्या संख्येने तरुणी येत आहेत,

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा नावलौकिक वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचे आरोप होणे गंभीर आहे. अनेक तरुणींची क्रीडा क्षेत्रातील वाट रोखण्याबरोबरच त्यांचे मानसिक खच्चीकरणही यामुळे होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्वसंबंधित घटकांनी हा विषय सनसनाटी न बनवता तो गंभीरपणे आणि जबाबदारीने हाताळावयास हवा. टोकियो ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट पराभूत झाल्यानंतर सिंह यांनी तिचा उल्लेख 'खोटा सिक्का' असा केला होता. त्यामुळे आपले मानसिक खच्चीकरण झाल्याचा आणि आत्महत्येच्या विचारापर्यंत आपण पोहोचल्याचा आरोपही फोगाटने केला. क्रीडा संघटनेच्या प्रमुखांचे हे वर्तन आक्षेपार्ह आहेच. राष्ट्रकुल स्पर्धेत तीनवेळा सुवर्णपदक विजेत्या फोगाटने सिंह यांच्याविरोधात महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. लैंगिक शोषण झालेली एकही खेळाडू पुढे आलेली नाही, हेही इथे लक्षात घ्यावयास हवे.

सिंह यांची हुकूमशाही, मनमानी कारभार किंवा खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची उदासीनता हे वेगळ्या प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्यावरील खेळाडूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप वेगळ्या प्रकारचा आहे. दोन्हींचा एकाच दृष्टिकोनातून विचार करता येत नाही. फोगाटने विषयाला वाचा फोडली असली तरी त्यासंदर्भातील ठोस पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे कोणतीही शहानिशा न करता एखाद्याला अशा प्रकारच्या आरोपांवरून पिंजर्‍यात उभे करणे योग्य नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. फोगाटने शोषण झालेल्या खेळाडूंची नावे चौकशी समितीकडे देऊन त्यासंदर्भातील शहानिशा करून घ्यावयास हवी आणि आरोपांत तथ्य आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावयास हवी.

परंतु केवळ आरोपांवरून एखाद्याची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणे न्यायाला धरून होणार नाही. उद्या एखाद्याची कारकीर्द संपवण्यासाठी ऊठसूट असे आरोप केले जाण्याचा धोकाही आहे. या प्रकरणाला असलेली कुस्ती संघटनेच्या राजकारणाची किनारही दुर्लक्षित करून चालणार नाही. कुस्ती महासंघामध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध हरियाणा असा संघर्ष परंपरागत आहे. बृजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या काही मनमानी निर्णयाचा फटका हरियाणातील खेळाडूंना बसला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळू लागल्यानंतर गेल्या दशकभरात कुस्तीला 'ग्लॅमर' प्राप्त होऊ लागले. केवळ सरकारी मदतीवर अवलंबून असलेल्या खेळाडूंना कॉर्पोरेट पुरस्कर्ते मिळू लागल्याने त्यांना परदेशी सरावाबरोबरच परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचाही लाभ मिळू लागला.

दरम्यान, गतवर्षी कुस्ती महासंघाने अशा प्रकारच्या बाहेरील मदतीवर बंदी घातली आणि अशा मदतीसाठी कुस्ती महासंघाच्या परवानगीची अट घातली. खेळाडूंना मिळणार्‍या सुविधांवर त्याचा विपरीत परिणाम झाला. टोकियो ऑलिम्पिकनंतर एकही खेळाडू विदेशात गेला नाही, त्यांचे विदेशी प्रशिक्षकही हटविण्यात आले. भारतीय प्रशिक्षकांसोबत सराव करणार्‍या खेळाडूंना मनासारखे प्रशिक्षणही मिळेनासे झाले. दरम्यान, कुस्ती महासंघाने 2018 मध्ये बीसीसीआयप्रमाणे मल्लांशी करार केला; पण त्याचीही नीट अंमलबजावणी झाली नाही. एकीकडे बाहेरून मिळणारी मदत बंद झाली आणि दुसरीकडे कुस्ती महासंघही पुरेशी मदत करीत नसल्यामुळे खेळाडूंमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला होता.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सिंह यांच्या दबंगगिरीपुढे कुणाचे काही चालेनासे झाले. त्यांच्या विरोधातील असंतोष हळूहळू उफाळू लागला आणि त्याची परिणती गंभीर आरोपांमध्ये झाली. ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात येऊ शकेल की, हे वरवर दिसते तेवढे साधे राजकारण नाही. एकूणच कुस्तीच्या आखाड्यातील हा घाणेरडा खेळ आहे. दोन्ही अर्थांनी घाणेरडा आहे. आपले आर्थिक हितसंबंध दुखावले म्हणून खेळाडूंनी जर सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केले असले तरी आणि त्यांच्यावरील आरोप खरे असले तरीही त्याला घाणेरडा खेळच म्हणावे लागेल. म्हणूनच एकूण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावयास हवी.

SCROLL FOR NEXT