Latest

कीटकांची दुनिया धोक्यात

Arun Patil

गेल्या काही दिवसांत जगभरात कीटकांविषयी झालेल्या अध्ययनांचे आणि संशोधनांचे निष्कर्ष आणि आकडेवारी धक्‍कादायक आहे. कीटक आणि पतंगांच्या अनेक प्रजाती या जगातून नामशेष होत आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जगभरातील शेती बर्‍याचअंशी कीटक आणि पतंगांवर अवलंबून असते. हे छोटेसे जीव आपल्या जैवविविधतेसाठी आणि संपूर्ण परिस्थितीकीसाठी अत्यंतिक गरजेचे आहेत.

प्रत्येकाने फक्‍त एकच प्रश्‍न स्वतःला विचारून पाहावा. आपल्या अवतीभोवती फिरणारे फुलपाखरू आपण अखेरचे केव्हा पाहिले होते? आणखीही एक प्रश्‍न आपण स्वतःला विचारू शकतो तो असा की, फुलावर बसलेली मधमाशी आपण पाहिली होती, त्याला किती दिवस झाले? आपण जर एखाद्या मोठ्या शहरात किंवा महानगरात राहत असू, तर या प्रश्‍नाचं उत्तर अगदीच सोपं आहे, 'खूप वर्षे झाली!' जर आपण छोट्या शहरातील रहिवासी असू, तर उत्तर असेल, 'काही महिन्यांपूर्वी!'

जर आपण गावात राहत असू, तर उत्तर असेल, 'हल्ली फुलपाखरे फारशी दिसत नाहीत!' ही तीन उत्तरे म्हणजे विविध भौगोलिक परिसरांमधील जैव आणि नैसर्गिक विविधतेमध्ये आलेल्या बदलांचे वर्णन असून, त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. प्रकाशमान झालेल्या काजव्याचे दर्शन कधी झाले होते, असे जर आपण 20-21 वर्षांच्या एखाद्या तरुणाला विचारले, तर त्याचे उत्तर असेल, 'कधीच पाहिले नाही!' वरवर पाहता हे प्रश्‍न अगदी किरकोळ वाटतील.

कदाचित, हे प्रश्‍न विचारलेच जाता कामा नयेत, असेही वाटेल. परंतु, वास्तव असे आहे की, हे प्रश्‍न अत्यंतिक महत्त्वाचे आहेत. हे प्रश्‍न अशा सर्व किड्या-मकोड्यांशी संबंधित आहेत, ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कीटक आपल्या पर्यावरणासाठी आणि परिस्थितीकीसाठी अत्यंतिक गरजेचे आहेत, म्हणूनसुद्धा हे प्रश्‍न खूप महत्त्वाचे आहेत.

काही दशकांपूर्वी छोटी शहरे आणि निमशहरी भागात तलाव आणि पाण्याच्या अन्य स्रोतांजवळ ड्रॅगन फ्लाय म्हणजे चतूर दिसणे अगदी सामान्य मानले जात असे. त्यांना पाहून मुलांना खूप आनंद होत असे. परंतु, आज पाण्याचे स्रोतच संपत चालले आहेत आणि ड्रॅगन फ्लाय कुठेच दिसत नाहीत. मधमाश्या आणि रंगीबेरंगी फुलांभोवती गुंजन करणारे भुंगेही आता वर्षानुवर्षे दिसत नाहीत. असे अनेक कीटक जगातून लुप्त होत चालले आहेत.

आपल्या आसपास असणारी ही सृष्टी जणू अचानक गायब झाली आहे. ही वाटचाल वर्षानुवर्षे तशीच सुरू आहे. आपण सातत्याने निसर्गाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळेही असे घडत आहे. कीटकांची स्वतःची अशी एक स्वतंत्र दुनिया आहे. जैवविकासाच्या प्रक्रियेत कीटक ही खूप जुनी जीवसंरचना आहे. लाखो-कोट्यवधी वर्षांच्या विकासाच्या प्रक्रियेत कीटक आणि पतंगांनी मानवासोबत राहणे स्वीकारले आहे. शिकून घेतले आहे.

काही कीटक आपल्या आसपास राहतात, तर काही कीटक आपल्यापासून दूर निर्जन स्थळी वाढतात. काही दिवसांपूर्वी जगभरातील कीटकांवर करण्यात आलेल्या संशोधनाचे निष्कर्ष आणि आकडेवारी थक्‍क करणारी आहे. कीटक आणि पतंगांच्या अनेक प्रजाती या जगातून नामशेष होत आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जल-वायू परिवर्तन, निसर्गाचा र्‍हास आणि वाढता मानवी हस्तक्षेप यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरला आहे.

इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या संशोधनातून असे आढळून आले आहे की, जगभरात पाचातील एक ड्रॅगन फ्लाय, डॅमफ्लाय आणि अन्य कीटकांवर अस्तित्वाचे संकट पसरले आहे. ते विलुप्त होण्याच्या उंबरठ्याशी आहेत. त्यांच्या प्रजननासाठी आणि विकासासाठी आवश्यक असे गोड्या पाण्याचे स्रोत संपुष्टात आले आहेत. या कीटकांच्या 16 प्रजाती नष्ट होण्याच्या बेतात आहेत, असा अंदाज आहे.

'डाऊन टू अर्थ' या नियतकालिकात एक अहवाल सादर करण्यात आला होता. 1990 नंतर जगभरात कीटकांच्या संख्येत वेगाने घट झाल्याचे या अहवालात म्हटले होते. गोड्या पाण्याच्या स्वच्छ स्रोतांजवळ वाढणार्‍या कीटकांच्या संख्येत सर्वाधिक घट झाल्याचे त्यात म्हटले होते. आपल्या परिस्थितीकीय यंत्रणेत कीटक नसतील तर काय होईल? हे जग खरोखर आपल्याला राहण्यायोग्य राहणार नाही.

कीटक हे निसर्गातील सफाई कर्मचारी आहेत. ते राहिले नाहीत, तर सर्वत्र अत्यंतिक दुर्गंध आणि सडलेल्या, कुजलेल्या वस्तू पडलेल्या दिसून येतील. एवढेच नव्हे, तर अनेक प्रकारचे धोकादायक सूक्ष्मजीव मानवावर, पशूंवर आणि झाडाझुडपांवर हल्लेही करू लागतील.

आपल्याला अशा वातावरणात खरोखर राहायचे आहे का? झाडांचे परागीभवन आणि प्रजनन यासाठी कीटक आणि पतंगांचे असणे अत्यंत आवश्यक आहे. हे छोटे जीव राहिले नाहीत, तर वनस्पतींच्याही अनेक प्रजाती नष्ट होतील. त्यामुळे शाकाहारी जीवजंतूंची अन्‍नसाखळी तर विचलित होईलच शिवाय सर्वच जीवांसमोर प्राणाचे संकट उभे राहील. वनस्पतींसाठी धोकादायक असलेल्या परजीवींना खाण्याचे कामही अनेक कीटक करत असतात. हे परजीवीही अनेक प्रकारच्या धोकादायक सूक्ष्मजीवांचा सफाया करत असतात.

अनेक पक्षी असे आहेत, ज्यांच्या पिलांना सुरुवातीच्या काळ्यात किडेमकोडे हेच एकमेव अन्‍नाचे साधन असते. अशा परिस्थितीत, जर कीटक नष्ट झाले, तर पक्ष्यांच्याही अनेक प्रजाती नष्ट होऊ शकतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT