Latest

किशोरवयीन मुलांमधील निद्राविकार

Arun Patil

सोळा वर्षांखालील मुलांमध्ये निद्राविकार उद्भवतो तेव्हा तो ओळखणे अवघड असते. कारण प्रौढांप्रमाणे लहान मुले त्याविषयी सजग नसतात. त्यांना आपल्याला झालेल्या आजाराची लक्षणे ओळखता येत नाहीत. आपल्या झोपेचा काहीतरी खेळखंडोबा झाला आहे, हेच त्यांना कळत नाही. शिवाय त्यांच्यात तशी उघड चिन्हे दिसत नसल्याने त्याचे निदानही होत नाही.

अर्थात झोप उडण्याचे कारण केवळ त्यांच्यावर असलेला ताण एवढेच असेल, असे नाही. इतरही अनेक कारणे असतात. काही वेळा मुलाच्या टॉन्सिल्स वाढतात, त्याचा परिणामही झोपेवर होतो.

निद्राविकाराचे 80 प्रकार आहेत. त्यातील घोरणे आणि तोंडाने श्वास घेणे हे दोन विकार लहान मुलांमध्ये सर्वाधिक आढळतात. एका अहवालानुसार निद्राविकाराच्या पाच रुग्णांपैकी दोन रुग्ण हे सोळा वर्षांखालील मुले असतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार घोरणे, तोंंडाने श्वास घेणे, बिछाना ओला करणे या सगळ्या समस्या मुलांना व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे निर्माण होतात, हेच अनेक पालकांच्या लक्षात येत नाही. याशिवाय झोपेत चालणे, झोपेत बडबडणे, वाईट स्वप्न पडणे असे प्रकारही झोप व्यवस्थित न येण्यामुळे घडतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. अनेक किशोरवयीन मुलांवर अभ्यासाचा ताण असतो.

रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसणे, उशिरापर्यंत नेटवर सर्फिंग करणे किंवा गेम खेळत बसणे, फोनवर बोलत राहणे, टीव्ही पाहणे यामुळेही झोपेवर परिणाम होतो. मुले केवळ पाच तास किंवा त्याही पेक्षा कमी वेळ झोपू शकतात. याचा परिणाम शेवटी निद्राविकार जडण्यात होतो.

मुलांनी सकाळी किती वाजता उठावे,हे ती रात्री कधी झोपतात यावर अवलंबून नसल्याने अनेकदा मुलांना पुरेशी झोप मिळत नाही. त्यांना ही झोप दुपारी झोपून पुरीही करता येत नाही. कारण सकाळची शाळा झाल्यानंतर दुपारी लगेच शिकवणीची रांग लागलेली असते. याचा परिणाम मग मुलांमध्ये सतत थकवा येणे, लहरीपणा, चीड आणणारे वर्तन करणे, एकाग्रता कमी होणे आणि त्याच्याशी संबंधित समस्या निर्माण होतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT