Latest

कासवरील फुलांचे जीवनमान बदलतेय!

निलेश पोतदार

सातारा : पुढारी वृत्तसेवा   जागतिक वारसा स्थळ व जैवविविधतेचे आगार असलेल्या कास पठारावरील फुलांच्या जीवनमानात बदल होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष स्थानिक अभ्यासकांनी काढला आहे. ऑक्टोबरमध्ये येणारी फुले यंदा ऑगस्टमध्ये उमललेली एकीकडे दिसत असताना दुसरीकडे मात्र ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये फुलणारी गेंद, सीतेची आसव इत्यादी फुलांचा अद्यापही बहर आलेला नाही. त्यामुळे कासच्या फुलांच्या जीवनमानात खरोखरच बदल होतोय का? याबाबत तज्ञांनी निष्कर्ष काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

कास पुष्प पठारने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्ह्याचा लौकीक नोंदवला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून समाविष्ट करण्यात आले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत आहे. पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे.

तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती आढळतात. सरपटणार्‍या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या 10 प्रजाती आणि पक्षांच्या 30 प्रजाती येथे आढळून येतात. कास पठार व परिसरात प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमध्ये जवळपास 40 फुले असणार्‍या प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठारासारखेच आणखी जवळपास 16 सडे आजूबाजूला आहेत. वेगवेगळी फुले, वनस्पतींबरोबरच पर्यटकांसाठी छोटे-मोठे झरे, धबधबे हे कास परिसराचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. मात्र, पठारावरील फुलांच्या जीवनमानात काही बदल होत असल्याचा प्राथमिक दावा काही अभ्यासकांनी केला आहे.

कास पठार ते राजमार्ग या रस्त्याच्या उजव्या बाजूला अडीच हेक्टर परिसरात कुमुदिनी तलाव पसरलेला आहे. या तलावामध्ये कुमुदिनीची फुले पृष्ठभागावर तर पाण्याच्या तळाला ही वनस्पती आढळते. यावर्षी कासच्या वातावरणात काय बदल झाला काय माहित, पण या कुमुदिनी तलावातील ऑक्टोबरमध्ये येणारी फुले चक्क ऑगस्टमध्ये आली आहेत. पहिल्यांदाच हा बदल घडला असून याबाबत स्थानिक संशोधकही आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.

अत्यंत दुर्मिळ असणारी ही फुले पाहण्याचा वेगळाच आनंद मिळतो. पण, ऑगस्टमध्ये कुमुदिनी तलावातील फुले फुलल्याने नक्की ही घटना फुलांसाठी चांगली आहे की, नुकसानदायक हे तज्ञांच्या अभ्यासानंतरच कळणार आहे. कासचा हंगाम दि. 25 ऑगस्टपासून सुरु झाला असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गतसाली बंद असणारा हंगाम यावर्षी सुरु झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पर्यटक पठारावर गर्दी करत आहेत. कास पठार कार्यकारी समितीमार्फत हंगामाचे नियोजन झाले आहे.

फुलांच्या जीवनमानातील बदल हा ऊन-पावसाच्या खेळाचा परिणाम असू शकतो. गेल्यावर्षी माणसांचा व पठारावर चरणार्‍या प्राण्यांचा वावर कमी होता. त्यामुळे यंदा पठारावरील फुले उमलण्यात फरक दिसू शकतो. पण, त्यावर आत्ताच बोलणं योग्य नाही. त्यासाठी चार-पाच वर्षे निरीक्षण करावे लागेल. गेल्या चार-पाच वर्षांत उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. पाऊस पण वाढला आहे. तापमानही 2 डिग्रीने वाढले आहे. कास पठार हे अतिसंवेदनशील अधिवास असलेले क्षेत्र आहे. झाडे, वनस्पती व कीटक यांचा अधिवास असल्याने याच्यावर परिणाम होत आहे.

– डॉ. संदीप श्रोत्री, अभ्यासक कास पठार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT