Latest

कामाचे वाढते तास, हृदयावर गंभीर परिणाम

Arun Patil

हृदयावर कामाच्या वाढलेल्या तासांचा गंभीर परिणाम हाेताे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या 'वर्क फ्रॉम होम' कल्चरचे जसे काही फायदे आहेत, तसेच तोटेदेखील आता समोर येत आहेत. कामाचे तास वाढणे, सतत एकाच जागी बसून राहिल्याने हालचाली मंदावणे, पचनासंबंधी तक्रारी, तणाव या कारणांमुळे हृदयावर त्याचा गंभीर परिणाम होतो.

आपल्यातील काही जण दिवसातून 14 ते 15 तास काम करत आहेत. एकदा लॅपटॉप, कॉम्प्युटर समोर बसलो की पुन्हा उठायला नको, कामाची लिंक तुटेल, काम पूर्ण झाल्यावरच उठूया अशा अनेक कारणांमुळे सलग 8 ते 10 बसणार्‍या व्यक्‍तींना मात्र धोक्याची घंटा आहे.

सलग काही तास एकाच ठिकाणी बसल्याने काम वेळेत पूर्ण होत असले तरी आपले शरीर आणि हृदयावर त्याचा गंभीर परिणाम होतो हे विसरून चालणार नाही.

ज्या लोकांना आधीपासूनच उच्च रक्‍तदाब आणि मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक असणे यांसारख्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना या बैठ्या कामामुळे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदय ठोक्यांची लय बिघडणे आदी समस्या उद्भवू शकतात.

हृदयरोग होण्यामागील कारणांमध्ये ताणतणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, चूकीची जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांचादेखील समावेश आहे. जे लोक जास्त तास काम करतात त्यांना हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. वाढत्या तासांमुळे पुरेशी झोप न लागणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, जंक फूडचे सेवन, अवेळी खाणे या गोष्टींमध्ये आणखी भर पडते.

काय काळजी घ्याल?

* आपल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीचे योग्य व्यवस्थापन करा. कोलेस्ट्रॉल हे हृदयरोगाच्या कारणांपैकी एक आहे. म्हणूनच, आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणे गरजेचे आहे. प्रक्रिया केलेले किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.

* रोजचा दिनक्रम आखा. दररोजचे वेळापत्रक पाळावे. यामध्ये व्यायाम आणि संतुलित आहाराचा समावेश करावा. दिवसा 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घ्यावी. स्वत:साठी काही वेळ काढण्याचा प्रयत्न करा.

* शारीरिकद‍ृष्ट्या सक्रिय रहा. दररोज 40 मिनिटे चालण्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. पोहणे किंवा धावणे तसेच सायकल चालवणे हेदेखील आपल्या हृदयासाठी उत्तम ठरू शकते. आपण आधीच हृदयरोगी असाल तर व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसेच प्रशिक्षकांची मदत घ्यावी. रक्‍ताभिसरण वाढवण्यासाठी शारीरिक हालचाली करत राहावे, चालणे किंवा एरोबिक्स हेेखील करू शकता.

* ज्यामध्ये सर्व आवश्यक पोषक आणि खनिजे असतील असा संतुलित आहार घ्या. भरपूर हिरव्या भाज्या आणि फळे असलेले पदार्थ खा, नॉनव्हेजिटेरियनसाठी आठवड्यातून एकदा चिकन आणि आणि मासे खाण्यास हरकत नाही. अक्रोड, सोयाबीन, फ्लेक्स बियाणे, एवोकॅडो, बेरी, शेंगदाणे, गाजर, रताळे, शिमला मिरची, पालक, शतावरी, टोमॅटो, ब्रोकोली, संत्री आणि पपई यांचे सेवन करा.

शर्कराययुक्‍त पदार्थ, तसेच साखरेचे प्रमाण अधिक असलेले पेय, खारट, मसालेदार, तेलकट, हवाबंद पदार्थ खाणे टाळा. आहारातून कार्बोनेटेड पेये काढून टाका. अल्कोहोलचे सेवन कमी करावे आणि धूम्रपान किंवा तंबाखूचा वापर सोडून द्यावा.

* डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घ्या. जर आपण उच्च रक्‍तदाब औषधे किंवा मधुमेहावरील औषधे वेळेवर घ्यावीत. आपल्या औषधांचे डोस चुकवू नका.

फोनच्या माध्यमातून डॉक्टरांची वेळोवेळी संपर्क साधावा. गरज नसल्यास बाहेर पडू नका. व्हिडीओ कॉलद्वारे आपल्या डॉक्टरांशी संपर्कात राहावे. नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.

डॉ. बिपीनचंद्र भामरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT