Latest

काबूल : तालिबान्यांच्या गोळीबारात १७ जण ठार

Arun Patil

काबूल ; वृत्तसंस्था : तालिबानने पंजशीर खोर्‍यावर ताबा मिळवल्याचा दावा शुक्रवारी केला. तालिबान विरुद्ध उभ्या ठाकलेल्या 'नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान'चा (एनआरएफए) पराभव झाल्याचा दावा केल्यानंतर आनंदोत्सवाचा भाग म्हणून तालिबान्यांनी काबूल मध्ये शुक्रवारी रात्री स्वैर गोळीबार केला.

त्यात 17 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. चाळीस जण या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती 'अस्वाका' या स्थानिक अफगाण वृत्तसंस्थेने दिली.

याआधी शेवटच्या अमेरिकन लष्करी विमानाने अफगाणिस्तानातून उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी स्वैर गोळीबाराच्या माध्यमातून आपला आनंद साजरा केला होता.

शुक्रवारच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, व्हिडीओत लोक त्यांच्या जखमी नातेवाईकांना रुग्णालयांत दाखल करण्यासाठी घेऊन जाताना दिसत आहेत.

पंजशीर आता आमच्या ताब्यात आले आहे, असे वृत्त 'रॉयटर्स'नेही तालिबान कमांडरच्या हवाल्याने दिलेले असले, तरी पंजशीरमधील नेते अहमद मसूद यांनी मात्र तालिबानचा हा दावा फेटाळला आहे. पंजशीरवरील तालिबानच्या विजयाची बातमी खोटी आहे.

पाकिस्तानी माध्यमे ती पसरवत आहेत. एका अन्य वृत्तानुसार स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे तालिबानविरोधी अमरुल्ला सालेहही पंजशीरमधून पळून गेल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, स्वत: सालेह यांनी 'टोलो न्यूज'शी बोलताना आपण पंजशीर खोर्‍यातच आहोत, असे सांगितले आहे.

वाटाघाटी फिसकटल्यानंतर तालिबानने पंजशीरवर हल्ला चढविला आहे. विरोधकांनीही तालिबानवर प्रतिहल्ले सुरू केले आहेत.

उमर यांचे अपहरण

तालिबानने नांगरहार प्रांतीय परिषदेचे उपप्रमुख अजमल उमर यांच्या घरावर धाड घातली आणि उमर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचे अपहरण केले आहे. सूत्रांच्या हवाल्याने 'इंडिया टुडे'ने हे वृत्त दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT