Latest

काँग्रेसची स्थिती : प्रत्येक नेता हाच एक पक्ष

backup backup

एकेकाळी देशभर अथांग पसरलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था आज मृत समुद्रासारखी झाली आहे. तरंगतात सारेच; पण बुडणार कुणी नाही, वाढणार कुणी नाही. कोणत्याही जीवाची चैतन्यदायी हालचाल त्यावर जाणवत नाही. एखाद्या माशाने सूर मारला आणि उठलेले तरंग अधिकाधिक जिवंत होत किनार्‍यापर्यंत धडकले, असेही काही घडत नाही. तरीही या मृत समुद्रावर काही नेते तरंगताना दिसतात. ठरवले तरी ते बुडणार नाहीत म्हणून दिसतात. असेच पिढ्यान्पिढ्या काँग्रेसच्या आधी जिवंत आणि आजघडीला पार मृतप्राय झालेल्या समुद्रावर ही मंडळी तरंगत पडून आहेत.

त्यांच्याकडून या अथांग पसरलेल्या मृत समुद्रात कोणते प्राण फुंकले जाणार आहेत? तशी अपेक्षा करू नये, असे सांगणारा रोज एक नवा दिवस या पक्षाच्या आयुष्यात उगवतो आणि मावळतो. या मुर्दाड स्थितीची कारणे महाराष्ट्रापुरती तपासली, तर लक्षात येते की, फार पूर्वी कशाला, अगदी 2009 पर्यंत महाराष्ट्रावर राज्य करणार्‍या प्रदेश काँग्रेसचे अस्तित्व आज नाही. या पक्षात प्रत्येक नेता हाच एक स्वतंत्र गट किंवा पक्ष म्हणून वावरताना दिसतो. प्रत्येकाला स्वतःचे पडले आहे. मी, माझे राजकारण, माझा मतदारसंघ, माझे कुटुंब आणि माझी पुढची पिढी, हे सारे सांभाळायचे म्हणून पक्ष लागतो आणि तो तेवढ्यापुरताच लागतो. त्यामुळे एखाद्या राष्ट्राची शकले उडतात आणि त्यातून फुटून निघालेल्या राज्यांची छोटी छोटी राष्ट्रे जन्माला येतात तसेच बाल्कनायझेशन प्रदेश काँग्रेसचे झालेले दिसते.

नाना पटोले हे म्हणायला प्रदेशाध्यक्ष; पण त्यांना प्रदेश काँग्रेस आपला नेता मानत नाही. भंडारा-गोंदियाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून पटोले यांनी मोठे आकांडतांडव केले; पण खंजीर खुपसलाच असेल तर ती पाठ पटोलेंची असेल, काँग्रेसचा जणू संबंध नाही अशा आविर्भावात अन्य कुणीही नेता पटोले यांच्या बाजूने बोलायला पुढे आला नाही. पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमानुसार चालवा. तसे पत्रच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. हा कुठला कार्यक्रम, असे स्वतःला विचारत काँग्रेसच्या मंत्र्यांनी आपापल्या पीएंना विचारले, तर त्यांनी हातावर ठेवला साडेतीन पानांचा किमान समान कार्यक्रम. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'मातोश्री'बाहेर पडलेच नाहीत आणि सारा राजशकट आपणच कसे हाकत आहोत, असा आविर्भाव अजित पवार यांनी आणलाच नाही आणि आघाडीचा धर्म म्हणून एकाचवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीला आपण कसे सांभाळून घेत आहोत आणि या दोन्ही पक्षांचा तोल सांभाळत आहोत, असे सांगणारे भाव चेहर्‍यावर सतत आणणे बाळासाहेब थोरातांनी बंद केले, तरी या महाराष्ट्राची नोकरशाही हा किमान समान कार्यक्रम राबवून राहील.

महाराष्ट्रातील प्रत्येक राजवटीत सहज राबवले गेलेलेच हे कार्यक्रम आहेत; पण या किमान समान कार्यक्रमानुसार सरकार चालवलेच जात नाही, अशी हाकाटी पटोलेंनी सुरू केली आणि या कार्यक्रमानुसार मंत्रिपदाच्या खुर्च्यांत बसलेल्या एकाही काँग्रेस मंत्र्याने त्याची दखल घेतली नाही; कारण पटोलेंचे वजनच तेवढे आहे. ते प्रदेशाध्यक्ष असले, तरी त्यांना अस्सल काँग्रेसी नेते उपराच मानतात. सत्तेचा वाटा मिळाला नाही म्हणून हे नाना सतत ठणाणा करणारच, असेही त्यांनी ठरवून टाकले आहे. जे सत्तेत आहेत त्यांचाही तसा प्रदेश काँग्रेसशी संबंध नाही. काँग्रेस नावाला आहे, प्रत्यक्षात सरकारमध्ये काँग्रेसच्या नावावर सहभागी झाले ते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण नावाचे स्वतंत्र पक्ष. राज्याचा आवाका नसल्याने फार तर जिल्हा पक्ष म्हणा, प्रत्येक नेता स्वतंत्र पक्ष म्हणूनच काम करतोय याचा अनुभव या राज्यसभा निवडणुकीतही आला.

उत्तर प्रदेशचे पडेल नेते इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर करताच आशिष देशमुख यांनी प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. राज्यसभेचा उमेदवार असा बाहेरून लादणे हा इथल्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे, असे त्यांचे म्हणणे. प्रतापगढींच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसमध्ये असंतोष इतकीच एक बातमी यानिमित्ताने येऊन गेली. आशिष देशमुख नावाचे कुणी सरचिटणीस प्रदेश काँग्रेसमध्ये आहेत हे तोपर्यंत कुणाला माहीत होते? पण राजीनाम्यामुळे ते तेवढ्यापुरते चर्चेत आले. त्यांच्या राजीनाम्यानेही प्रदेश काँग्रेसच्या मृत समुद्रावर साधा तरंगदेखील उठला नाही. ज्येष्ठ नेते रणजित देशमुखांचा वारस असले, तरी नानांप्रमाणे हे आशिष देशमुखसुद्धा तसे बाहेरचेच. 2014 ला त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. काटोल विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख यांचा पराभव करून ते जायंट किलर म्हणून पुढे आले. त्यांना वाटले देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची बक्षिसी मिळेल. तसे काही झाले नाही.

देशमुखांची भाजपवरची वासना मग उडाली आणि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर भाजपला रामराम ठोकत ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 2019 च्या निवडणुकीत फडणवीस यांच्याविरोधात नागपुरात हौतात्म्य पत्करणारा काँग्रेसला कुणी तरी हवा होता. आशिष देशमुख उभे राहिले आणि पडले. हाच काय तो त्याग त्यांच्या नावावर जमा आहे; पण म्हणून काँग्रेसमध्ये त्यांना सवाष्णांच्या पंक्तीला बसण्याचा मान मात्र नाहीच मिळाला. कारण, मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस श्रेष्ठींनी उत्तरेचा प्रतापगढी महाराष्ट्रात पाठवला हे त्यांच्या लक्षात आले नाही. हीच गत आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचीही होऊ घातली आहे. भाई हे मुंबई काँग्रेसचे चॉकलेट हिरो असले, तरी त्यांना बघून काँग्रेसला कुणी मतदान करण्याची शक्यता नाही. हिंदी सोडा, मराठी मतेही ते खेचू शकत नाहीत. तरीही हा माणूस आपणच पक्ष आहोत, हा आविर्भाव बाळगून आहे.

'इतना अ‍ॅटिट्यूड लाते कहां से तुम,' असे त्यांना अजून कुणी विचारले नाही. उद्या प्रतापगढी कदाचित विचारेल; कारण मुंबईतून निघून पनवेलमध्ये नवसंकल्प शिबिर घेत भाईंनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला. मुंबई स्वबळावर लढवणे आणि नंतर शिवसेना-राष्ट्रवादीच्या सत्तेत सहभागी होणे हे काँग्रेसला फायदेशीर ठरणार असले, तरी भाईंचे ऐकणार कोण? भाई प्रदेश काँग्रेसला विचारत नाहीत, प्रदेश काँग्रेस भाईंसोबत उभी नाही, प्रदेश काँग्रेसप्रमाणे मुंबई काँग्रेसची अवस्थाही जितके नेते, तितके पक्ष, अशीच झालेली असताना काँग्रेसच्या अथांग मृत समुद्राचा उद्धार होणे तसे कठीणच. त्यामुळे ज्यांच्याकडे पद आहे, सत्ता आहे ते नेते फक्त स्वतःचा विचार करत या समुद्रात असेच तरंगत पडून राहणार आहेत. राजकीय प्राक्तन मृतप्राय झालेल्या कोणत्याही पक्षाच्या बाबतीत आणखी वेगळे काही घडण्याची आशा कशी बाळगता येईल? ही आशादेखील अशीच मुर्दाड समुद्रात तरंगताना दिसते. ही आशा जिवंत नाही आणि बुडून मरणारदेखील नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT