Latest

अग्रलेख : काँग्रेसचे स्वप्नरंजन !

अमृता चौगुले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस हायकमांडशी जवळीक असलेले सलमान खुर्शिद यांनी लिहिलेल्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकातील उल्लेखांमुळे हिंदू आणि दहशतवाद या दोन्ही शब्दांना जोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आहे. काँग्रेसप्रणीत यूपीएच्या राजवटीत 'भगवा दहशतवाद' हा शब्द संघ परिवार व भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या भाजपला व हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून काँग्रेसने हिणवलेल्या गुजरातच्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला देशातील जनतेने दोनदा पूर्ण बहुमत दिले. यामुळे हिंदू अथवा हिंदुत्व हा शब्द देशाच्या राजकारणातील मध्यवर्ती झाला आहेच. हिंदुत्ववादाची तुलना इसिस, बोको हराम या टोकाच्या कट्टरतावादी आणि मानवतेला काळिमा फासणार्‍या संघटनांशी ज्यांनी केली, ते खुर्शीद यांच्या पक्षालाही निवडणुकांच्या तोंडावर हिंदुत्वाची आठवण होते, भुरळ पडते, हा जुना इतिहास आहे. काँग्रेस नेतेे राहुल गांधी, प्रियांका गांधी मंदिरांमध्ये जाऊन आपणही हिंदूंच्या विरोधात नाही, हे बिंबवण्याचा प्रयत्न का करीत आहेत? दुसरीकडे भाजपने असलेले मित्र गमावले असून नवीन मित्र जोडले जाण्याची शक्यता दिसत नसताना काँग्रेसचे सौम्य हिंदुत्व या पक्षाला 2024 मध्ये पुनरुज्जीवित करू शकते, असाही एक मतप्रवाह आहे. मात्र, काँग्रेस नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे वा नेली जात आहे? काँग्रेसची अवस्था भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे. आधीच 'जी-23' नावाने स्वतंत्र गट स्थापन केलेल्या नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वालाच संशयाच्या भोवर्‍यात उभे केले. या नेत्यांना टाळून पक्षाला पुढे नेण्याबाबत प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रियांका गांधी प्रयत्न करीत असतानाच पक्षाच्या तीन दिग्गज नेत्यांनी पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात केलेल्या निराधार टीका-टीप्पणीमुळे नवा वाद ओढवून घेतला. त्याचबरोबर काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांमधील अयोध्या आणि बाबरी मशीद विध्वंसाबद्दलची दोन टोकाची मतेही दिसून आली. 'अयोध्या खटल्याचा निकाल योग्य असून आता पुढे गेले पाहिजे', असेही हेच खुर्शीद सांगतात, तर दुसरे नेते पी. चिदम्बरम 'बाबरी विध्वंस ही लाजीरवाणी घटना होती', असे म्हणतात. तेच चिदम्बरम बाबरी मशीद पाडल्याच्या खटल्यातील सर्व 300 आरोपी निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला आक्षेपही घेतात. या सगळ्या प्रकारांकडे एकुणात बघितले, तर पक्षाच्या धोरणातील गोंधळ स्पष्ट होतो. संवेदनशील विषयांबाबतही काँग्रेस श्रेष्ठी व काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट होते. हा विसंवाद जाहीरपणे मांडून काँग्रेस नेते काय सांगू इच्छितात, हा खरा प्रश्‍न आहे. महाविध्वंसक, विनाशी, धार्मिक कट्टरतावाद जोपासणार्‍या आणि त्यासाठी नृशंस हिंसेचा आधार घेणार्‍या इसिसच्या विचारसरणीचे समर्थन कोणीच करणार नाही. भारतासारख्या लोकशाही देशात तिला कोणताच थारा नाही, याचे भान आधी ठेवावे लागेल.

काँग्रेसच्या नेत्यांनी हा गोंधळ आणखी वाढवला असून पक्षाचे नेते राहुल गांधी यांनीही हिंदू आणि हिंदुत्व या दोन स्वतंत्र संकल्पना स्पष्ट करताना शीख व मुस्लिमांची पिटाई करण्याला हिंदुत्व म्हणतात, असे लांगुलचालनाने कलुशीत वक्‍तव्य केले आहे. काँग्रेस पक्ष आणखी बारा वर्षांनी स्थापनेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करणार आहे. या पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत केंद्रस्थानी राहिल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांच्या आशा-आकांक्षांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. तो पक्ष आज अस्तित्वाची लढाई लढत असून पुन्हा भरारी घेण्यासाठी पक्षाला आपल्या विचारसरणीची फेरमांडणी करावी वाटली, तर त्यात काही वावगे नाही. मात्र, ती करण्याचा साधा प्रयत्नही करताना तो दिसत नाही. तात्विकद‍ृष्ट्या युक्‍तिवादात जिंकणे आणि लोकभावना जिंकणे या वेगवेगळ्या गोष्टी असतात. भारतासारख्या महाकाय देशामध्ये जनमताचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही युक्‍तिवाद कामी येत नाहीत, तर तेथे तुम्हाला अनुकूल विचारांची लहर निर्माण करावी लागते. हिंदू आणि हिंदुत्व यांच्यातील भेद लोकांना सांगणे आणि काँग्रेस कार्यकारिणीत भाषण ठोकून टाळ्या मिळवणे या भिन्‍न बाबी आहेत, याची जाणीव काँग्रेसमध्ये कोणालाच नसणे ही दुुर्दैवी बाब आहे. सध्या उत्तर प्रदेशातील निवडणुका तोंडावर आल्या असून तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्षांचे अयोध्येतील श्रीराम आराध्य आहेत. काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातील मंदिरांच्या पायर्‍या झिजवत आहेत. राजकीय पक्षांनी मतांची शेती करायची असते आणि त्यासाठी वैचारिक आंदोलनांनी लोकशाहीची मशागत करायची आहे. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने वैचारिक आंदोलनांची मशागत करण्याची जबाबदारी डाव्या विचारांचा प्रभाव असलेल्या मंडळींकडे आऊटसोर्स केली आहे. या मंडळींचे युक्‍तिवाद कितीही बिनतोड वाटत असले, तरी त्यातून मते मिळत नाहीत आणि लोकशाही डोक्यांच्या संख्येवर चालते, या वास्तवाचा त्यांना विसर पडला असला, तरी काँग्रेसला पडलेला विसर त्या पक्षासाठी निश्‍चितच चिंतेचा विषय ठरणार आहे. या मुक्‍ताफळांमुळे आधीच चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला उत्तर प्रदेशातील विधानसभांमध्ये काही ऊर्जा भेटणार नाही. उलट 2024 चा आशावादही आणखी धूसर होत जाईल. भारतीय राजकारणाचा लंबक मध्याकडून उजवीकडे काही अंशांत झुकला आहे, हे काँग्रेसला आधी मान्य करावे लागेल. आपले सर्वसमावेशक राजकारणाचे सूत्र पुन्हा नव्याने पटवून द्यावे लागेल, तसे जनमत तयार करावे लागेल. त्यासाठी नेमके करायचे काय आणि साधायचे काय, याचा विचार झाला पाहिजे. इसिस, बोको हरामशी हिंदुत्ववादाच्या तुलनेने स्वप्नरंजन भरपूर होईल इतकेच!

SCROLL FOR NEXT