Latest

कर्तव्यात कसूर केल्यास सरपंचांवर कारवाई करा;  उच्च न्यायालयाचे पंचायत संचालकांना आदेश

दिनेश चोरगे

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  कर्तव्यात कसूर केल्यास पंचायत संचालकांनी एका आठवड्यात सरपंचांवर कारवाई करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. सोमवारी कचरा व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या एका सुनावणीत हा आदेश देण्यात आला आहे.

याबाबत राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सांगितले की, न्यायालयाने आधी एका आदेशानुसार कोलवाळ पंचायतीला पंचायत क्षेत्रात कचरा व्यवस्थापन करण्यास सांगितले होते. तसेच येथे एक मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) उभारण्यासही
सांगितले होते. हे एमआरएफ १५ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश दिला होता.मात्र पंचायतीने दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे न्यायालयाने पंचायतीला भरण्यास सांगितलेले ९० हजार रुपये जप्त केले आहेत. त्यातील ८० हजार रुपये प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात येतील. यापुढे कोणत्याही सरपंचाने आपले काम योग्यरीत्या केले नाही तर पंचायत संचालकांना कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ रोजी ठेवण्यात आली आहे. यामध्ये पंचायत संचालक सरपंचावर पंचायत राज कायद्यानुसार कोणती कारवाई करायची आहे, त्याबाबत स्पष्टकरण देणार आहेत.

SCROLL FOR NEXT