सध्याच्या स्पर्धेच्या युगात युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याबरोबरच अन्य गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागते. करिअर मध्ये यशस्वी होण्याकरिता अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक ठरते.
* अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका : आपण आपल्या डोळ्यासमोर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरवत असताना वेगवेगळी क्षेत्रे ठेवलेली असतात. यापैकी कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना आपल्याला अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तुम्हाला करिअर करायचे असेल तर आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. अभ्यासामुळे आपली बुद्धिमत्ता प्रकट होत असते. तसेच अभ्यासातूनच करिअरमधील वेगवेगळे पर्याय सापडतात.
* स्वतःचे मूल्यांकन करा : आपल्या भावाने किंवा जवळच्या मित्राने एका विशिष्ट क्षेत्रात चांगले करिअर केले असेल तर त्याच्या प्रमाणेच आपणही करिअर करू शकू, अशी स्वप्ने पाहू नका. आपल्या अंगात कोणत्या पात्रता आहेत, याचा प्रामाणिकपणे विचार करा. आपल्या व्यक्तिमत्त्वातील चांगल्या आणि सकारात्मक बाजू नोंदवून ठेवा. या बाजू लक्षात घेऊन आपण कोणत्या क्षेत्रात काय करू शकतो, याचा सल्ला एखाद्या तज्ज्ञाकडून घ्या. आयुष्यात पुढे काय करायचे याचा निर्णय घेताना आई-वडिलांशी तसेच घरातील अन्य वडीलधार्या व्यक्तींशी चर्चा करा. मुळात आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे, कोणत्या विषयात रस आहे हे ओळखा. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळाली तर त्यासारखी मोठी गोष्ट दुसरी कोणतीच नसते.
* पालकांशी मोकळेपणाने बोला : बारावीच्या परीक्षेनंतर अथवा एखादी पदवी प्राप्त केल्यानंतर पुढे काय करायचे, असा प्रश्न तुमच्यापुढे उभा राहतो. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे पालकांना समजेल अशा पद्धतीने सांगितले पाहिजे. असे केले तर पालकांना आपल्या मुलाला/मुलीला नेमके काय करावयाचे आहे हे कळू शकते. त्या विशिष्ट क्षेत्रातील करिअरमध्ये भविष्यकाळात कोणत्या संधी आहेत, कोणत्या पदावर काम करायला मिळेल, किती वेतन मिळेल आदी सर्व गोष्टींची चर्चा पालकांबरोबर मोकळेपणाने केली पाहिजे. पालकांच्या मनातील शंका दूर झाल्या तर ते आपल्याला त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी परवानगी देऊ शकतात.
* आपल्या क्षेत्रासंबंधी अधिकाधिक माहिती मिळवा : तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचे असेल त्या क्षेत्रासंबंधी जितकी अधिक माहिती मिळवता येईल तितकी मिळवा. त्या क्षेत्रात काम करणार्या आपल्या परिचित लोकांना भेटा. त्या करिअरमधील फायदे-तोटे, भविष्यातील संधी आदी माहिती परिचितांकडून जाणून घ्या.
* ग्लॅमरला भुलू नका : काही क्षेत्रांत केवळ ग्लॅमरला भुलून करिअरसाठी प्रवेश केला तर आपली फसगत होण्याची शक्यता असते. आपल्याला ग्लॅमर असलेल्या क्षेत्रात गती आहे का, त्या क्षेत्रातील ज्ञान आपल्याला आहे का? याचे आत्मपरीक्षण करा आणि मगच त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घ्या. ग्लॅमरला भुलून अशा क्षेत्रात प्रवेश केला तर कालांतराने आपल्या पदरी निराशा आणि अपेक्षाभंग येण्याची शक्यता असते. त्या स्थितीतून बाहेर पडणे अवघड होऊन जाते.
* सुट्टीमध्ये पूरक अभ्यासक्रम पूर्ण करा : आपण शिक्षण घेत असाल तर परीक्षा झाल्यानंतरच्या काळात एखादा अभ्यासक्रम आपण पूर्ण करू शकतो. दोन-तीन अथवा सहा महिन्यांचा कालावधी असलेला एखादा अभ्यासक्रम आपल्या करिअरमध्ये उपयोगी ठरू शकतो. आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, त्या क्षेत्रात कोणता पूरक अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो याची माहिती मिळवा. एखाद्या भाषेचाही अभ्यासक्रम आपण पूर्ण करू शकता. जर्मन, स्पॅनिश, जापनीज अशा भाषांचे पदवी/पदविका अभ्यासक्रम आपले शिक्षण घेतानाच पूर्ण करता येऊ शकतात. परीक्षा संपल्यानंतरच्या उन्हाळी सुट्टीमध्ये असे अभ्यासक्रम आपण पूर्ण करू शकतो.