Latest

कपिल देव भडकले, विराट-रोहितला हाणले टोले

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : संघाच्या गरजेच्या वेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली नेहमी आऊट होतात, असे रोखठोक वक्तव्य भारताचे विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएल 2022 चा हंगाम दोघांसाठी चांगला गेला नाही.

आयपीएल 2022 संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेकडे लागल्या आहेत, पण या मालिकेत टीम इंडियाचे 2 स्टार म्हणजेच कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली खेळणार नसून केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या तिन्ही खेळाडूंबाबत बोलताना कपिल म्हणाले, टीम इंडियाच्या या तिन्ही खेळाडूंची विश्वासार्हता पणाला लागली आहे. तिघेही दबावाखाली खेळत आहेत, पण त्यांनी याबद्दलची चिंता न करता खेळायला हवे. तुम्हाला न घाबरता क्रिकेट खेळावे लागेल. कारण हे तीन खेळाडू असे आहेत जे 150-160 च्या स्ट्राइक रेटने धावा करू शकतात.

फक्त एक विचित्र गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा संघासाठी धावा करण्याची गरज असते, तेव्हा हे लोक झटपट बाद होतात. जेव्हा जेव्हा डावाला गती द्यावी लागते तेव्हा ते बाद होतात. त्यामुळे संघावर दबाव वाढतो. त्यामुळे तुम्ही एक तर स्ट्रायकरच्या भूमिकेत राहा आणि धावगती वाढवा, किंवा मग अँकरच्या भूमिकेत राहा आणि शेवटपर्यंत खेळपट्टीला चिकटून राहा, असे सडेतोड मत कपिल देव यांनी मांडले.

राहुलला त्याचा रोल ठरवून द्या

केएल राहुलची संघातील भूमिका त्याला स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. जर संघाने त्यांना सांगितले की तुम्हाला 20 षटके खेळायची आहेत आणि तुम्ही 60 धावा करून नाबाद आलात तरी चालेल, तर ते योग्य ठरणार नाही. तुम्हाला तुमचा द़ृष्टिकोन बदलावा लागेल. कारण असे झाले नाही तर तुम्ही तुमच्या खेळाडूचा नीट वापर करणार नाही, आणि त्यामुळे तुम्हाला खेळाडू बदलावे लागतील, असे कपिल देव म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT