Latest

कणेरी मठाचे कार्य लोकहिताचे : नारायण राणे

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र कणेरीमठाचे सामाजिक, कृषी, शिक्षण आरोग्य क्षेत्रांतील काम दीपस्तंभासारखे आहे. देशात अनेक ठिकाणी मठ आहेत; परंतु धर्माकार्यासोबतच लोकहिताचे कार्य करणार्‍या या मठाचे काम पाहून मीही भारावून गेलो आहे. पर्यावरण रक्षणाची प्रेरणा घेऊनच मी यापुढे कार्य करत राहीन, अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी येथे दिली.

येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानच्या कणेरीमठाने आयोजित केलेल्या सुमंगलम् पंचामहाभूत लोकोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होराठी, अद़ृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

राणे म्हणाले, कृषी, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच प्रकारच्या क्षेत्रांत मठाचे काम अतुलनीय असे आहे. काडसिद्धेश्वर महाराज यांनी धार्मिक कार्याला आधुनिकतेची जोड देऊन या मठाचे नंदनवन केले आहे. देशात आदर्शवत असा हा मठ आहे. त्यामुळेच या कार्यक्रमासाठी मी आलो. या पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन मी जाणार आहे. पर्यावरण रक्षणाची एक चळवळ उभी करण्याच्याद़ृष्टीने मी कार्यरत राहीन.

आम्ही राजकीय कार्यकर्ते पदाच्या लालसेने विविध प्रकारची कामे करत असतो; परंतु कणेरी मठ आणि काडसिद्धेश्वर महाराजांनी कोणताही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता केवळ जनकल्याणासाठी पंचमहाभूत तत्त्वाचा प्रसार करणे आणि पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे यासाठी सुरू केलेली ही चळवळ निश्चितच देशभरच नव्हे तर जगभरही पोहोचेल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.

दत्तात्रय होसबाळे म्हणाले, प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे. पर्यावरणाचा र्‍हास होईल, अशा प्रकारचे कोणतेही वर्तन मानवाने करू नये. छोट्या- छोट्या गोष्टीतूनही आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. पर्यावरणाचे रक्षण केले नाही तर भावी पिढीसाठी, शुध्द हवा, पाणी आपण शिल्लक ठेवू शकणार नाही. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

यावेळी कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार महेश शिंदे यांनी केले.

आमदार शिंदे स्वच्छतादूत

आमदार महेश शिंदे हे स्वच्छतादूत आहेत. पहाटे 4 वाजल्यापासून ते आपल्या सहकार्‍यांसमवेत स्वच्छता मोहीम घेतात. स्वच्छतागृहासह सर्व प्रकारच्या स्वच्छता मोहिमेत ते स्वत: भाग घेतात. त्यामुळे ते स्वच्छतादूतच आहेत, असा उल्लेख मंत्री नारायण राणे यांच्यासह सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात केला.

SCROLL FOR NEXT