कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' असे भजनातून नामस्मरण करत एसटी कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शनिवारी येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एसटी कर्मचार्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी हे भजन झाले. सहाव्या दिवशी कर्मचार्यांचे आंदोलन सुरूच राहिले. 'एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता', 'आमच्या मागण्या मान्य करा, हम सब एक है' अशा घोषणा देत कर्मचार्यांनी परिसर दणाणून सोडला.
एस. टी.चे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरात गेल्या सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. गेली सहा दिवस मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात दररोज एक हजार ते 1500 कर्मचारी या आंदोलनात सहभागी होत आहेत. आंदोलनामुळे बससेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांनीही बसस्थानकांकडे पाठ फिरवली. ते पर्यायी व्यवस्था शोधली जात आहे. दरम्यान, एका कर्मचार्याने एस.टी.तील निर्विकार चेहर्याच्या कर्मचार्यांचा मुखवटा घालून व लालपरी व शिवशाही या बसेस फोटो असलेले जॅकेट घाऊन एसटीचे शासनात विलिनीकरण करा, असे यातून सूचित केले जात होते.
खासगी प्रवासी वाहनांना गर्दी
खासगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांच्या थांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी केली जात आहे. एरव्ही नऊपेक्षा जादा प्रवासी दिसले की, कारवाई करणार्या परिवहन खात्याने प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याचा गैरफायदा घेत वडापमधून दहा ते पंधराच्या पुढेच प्रवासी घेऊन वाहतूक केली जात आहे.
कारवाईच्या भीतीने एस.टी. चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
गारगोटी पुढारी वृत्तसेवा
मडिलगे खुर्द येथील एस.टी. चालक अनिल मारुती कांबळे (वय 30) यांचा हृदयविकाराच्या तीव— धक्क्याने शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला. ते गेले काही दिवस निलंबनाची कारवाई होईल, या भीतीपोटी तणावाखाली होते. सावंतवाडी आगारात ते चालक म्हणून कार्यरत होते.
कांबळे हे शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास मडिलगे खुर्द येथे आले होते. सध्या एसटी कर्मचार्यांचे आंदोलन सुरू आहे. कारवाई होईल, या भीतीपोटी ते तणावाखाली वावरत होते. शनिवारी सायंकाळी छातीत दुखू लागल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना गारगोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गारगोटी ग्रामीण रुग्णालय परिसरात एसटीचे कर्मचारी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्यांचा मुलगा नववीच्या वर्गात शिकत असून मुलगी सातवीच्या वर्गात शिकत आहे. ते 2015 मध्ये चालक म्हणून सावंतवाडी आगारात रूजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.