Latest

एमपीएससीत सातार्‍याचा डंका, रोहित कट्टे-पाटील अभियांत्रिकीमध्ये राज्यात पहिला

Arun Patil

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : माण तालुक्यातील गोंदवलेचा रोहित कट्टे-पाटील याने अभियांत्रिकीमध्ये राज्यात पहिला क्रमांक, तर मर्ढे (ता. सातारा) येथील अनुजा जाधव हिने 9वा क्रमांक पटकावला. त्याचवेळी माण तालुक्यातील वरकुटेच्या मुकेश सजगाने हा एनटीसी प्रवर्गात राज्यात पहिला आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 4, 5 व 6 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल आयोगाच्या वेबसाईटवर मंगळवारी प्रसिध्द करण्यात आला. जिल्ह्यातील तिघांनी या परीक्षेत झेंडा फडकवला. नागरी अभियांत्रिकी सेवा परीक्षेत गोंदवले बुद्रुक येथील रोहीत शिवाजीराव कट्टे-पाटील याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत त्याची सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. रोहीतचे वडील शिवाजीराव कट्टे-पाटील हे देखील सिव्हील इंजिनिअर असून ते घोडेगाव जिल्हा पुणे येथे प्राध्यापक आहेत. तर आई गृहिणी आहे.

रोहीतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी ता. आंबेगाव जि. पुणे येथे झाले. त्यानंतरचे बी.ई. सिव्हीलचे शिक्षण एमआयटी कॉलेज पुणे येथे झाले. तसेच एमटेकचे शिक्षण व्हीएनआयटी नागपूर येथे झाले. शिक्षणानंतर मुंबई मेट्रोमध्ये एक वर्ष त्यांनी इंजिनिअर म्हणून नोकरी केली. त्यानंतर एमपीएससी व युपीएससी परीक्षा देण्यासाठी व त्याच्या अभ्यासासाठी दिल्ली येथे एक वर्ष शिक्षण घेतले.

मर्ढे, ता. सातारा येथील अनुजा राजेंद्र जाधव हिने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेत राज्यात 9 वा क्रमांक मिळवला आहे. वर्ग 1 अधिकार्‍यांच्या 14 पोस्ट जागा असून त्यामधील एक जागा अनुजाला मिळणार आहे. अनुजाचे वडील राजेंद्र जाधव हे माजी सरपंच असून ते शेतकरी आहेत. अनुजाचे प्राथमिक शिक्षण मर्ढेतील जि.प. शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण सातार्‍यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण सायन्स कॉलेजमध्ये झाले. तर सांगली येथील वालचंद कॉलेजमध्ये तिने सिव्हील इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.

एमपीएससी व युपीएससीसाठी अनुजाने हैद्राबाद येथे एक वर्ष अभ्यास केला. मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे तिला सातार्‍यात परतावे लागले. गावी आल्यानंतर लॉकडाऊन कालावधीत घरी राहूनच अभ्यास केला. त्यानंतर सातारच्या यशवंत स्पर्धा परीक्षा केंद्राच्या अभ्यासिकेत रोज 12 तास अनुजा अभ्यास करत होती. त्याचेच फळ तिला आता मिळाले आहे.

माण तालुक्यातील विरकरवाडी (म्हसवड) गावचे सुपुत्र मुकेश अंकुश सजगाणे याची गट-विकास अधिकारी वर्ग-2 या पदावर राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली. मुकेश सजगाणे हा विरकरवाडी गावचा रहिवासी असून तो मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवले आहे. घरची परिस्थिती बेताचीच असताना त्याने अनेक कौटुंबिक समस्येवर मात करत हे यश मिळवले आहे. मुकेश सजगाणे याची निवड झाल्याचे जाहीर होताच आई सुनंदा, वडील अंकुश सजगाणे, चुलते वस्ताद सजगाणे, गजानन सजगाणे आणि संपूर्ण सजगाणे कुटुंबातील सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT